सोलापूर : अंकोली येथे घरफोडी, २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास | पुढारी

सोलापूर : अंकोली येथे घरफोडी, २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास

मोहोळ, पुढारी वृत्तसेवा : घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (२७ मे) रात्रीच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात घडली. अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंकोली (ता. मोहोळ) येथील अनंत रमेश क्षीरसागर हे शेतकरी असून त्यांनी शेतात नवीन घर बांधले आहे. नवीन घराच्या पूजेसाठी त्यांची बहीण १३ मे रोजी येथे आली होती. ती तिच्या सासरी जाणार असल्यामुळे अनंत क्षीरसागर यांनी २७ मे रोजी तिच्या बॅगेची आवराआवर करून ठेवली होती. त्यानंतर रात्री दहा वाजता घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. तर अनंत क्षीरसागर हे शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर येणार असल्याने घराला बाहेरून कडी कोयंडा लावून तिकडे गेले होते.

पहाटे तीन वाजता काम संपवून ते घरी आले. यावेळी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहिले असता, बहिणीची बॅग उचकटलेली दिसली. बॅग चेक केली असता त्यामधील पर्स गायब होती. त्या पर्समधील १ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, अष्ट्याहत्तर हजार रुपयांचा लक्ष्मीहार व पाच हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

या प्रकरणी अनंत रमेश क्षीरसागर यांनी २८ मे रोजी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button