सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी पोचवण्यासाठी प्रयत्नशील : जयंत पाटील | पुढारी

सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी पोचवण्यासाठी प्रयत्नशील : जयंत पाटील

सांगोला : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी पक्ष संघटना सक्षम, मजबुत करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे विधानसभेच्या प्रत्येक बुथवर आपला कार्यकर्ता सक्षमपणे काम करणारा असावा. अतिरिक्त पाणी सांगोला तालुक्याला देऊन प्रत्येक गावांमध्ये पाणी पोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीच्या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, लढायच्या वेळी सैनिक हजर असणे आवश्यक आहे. धोतर आणि टोपी घालणाऱ्या व्यक्तीवर माझा विश्वास आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देत होता, पण आता आपण पाठिंबा देण्याचे बंद करून एकजुटीच्या ताकतीने लढले पाहिजे. पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष केले तर निवडणूका लढवताना अडचण निर्माण होते. यासाठी पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे आणि येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत करुण लढवणार आहे. आगामी काळात सांगोला तालुका राष्ट्रवादीमय झाला पाहिजे. आत्तापर्यंत या कालावधीमध्ये टेंभू उपसा योजना म्हैशाळ उपसा योजना यासाठी मोठे काम केले आहे. या योजनेचे पाणी सांगोला तालुक्यातील शेतीला पोचले आहे. पण सध्या अतिरिक्त असलेले पाणी सांगोला तालुक्यातील गावा-गावांपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी मिळून केले पाहिजे.

सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील डाळिंब द्राक्ष बागाचे बदलत्या वातावरणामुळे नुकसान होत आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागा तेल्या व मर रोगामुळे नष्ट होऊ लागल्या आहेत. अशा कालावधीत शेतकऱ्यांना बँकानी दिलासा द्यावा. पिक विमा उतरणार्‍या कंपन्या अशा वेळी शेतकऱ्यांना लक्ष देत नाहीत. यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. डाळिंबावर संशोधन व्हावे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न करून सोलापूरला डाळिंब संशोधन केंद्र आणले. परंतु या संशोधन केंद्रामार्फत तेल्या व मर रोगावर संशोधन होताना दिसत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोना कालावधीमुळे जनतेशी संपर्क येऊ शकला नाही. हे संकट सध्या दूर होताना दिसत आहे. सांगोला तालुक्यातील विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी होणाऱ्या निवडणुका पक्ष संघटना बळकट करून ताकदीनिशी लढवल्या पाहिजेत व सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा उभा केला पाहिजे.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष महिबुब शेख, सक्षणा सलगर, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, नागेश फाटे, रमेश बारसकर, अरुण आसबे, गणेश पाटील, दिपाली पांढरे, सुप्रिया गुंड, श्रेया भोसले, बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button