

Sharad Pawar On NCP Merger Ajit Pawar Supriya Sule
पुणे : राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबतचा निर्णय आता खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीच घ्यावा, असे धक्कादायक विधान शरद पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केले. त्यामुळे राजकीय भूकंपाच्या शक्यतेवर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
पुण्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले होते. आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह असल्याचंही त्यांनी सांगितले होते. एका गटाला वाटतं आम्ही एकत्र यावं, तर दुसर्या गटाला वाटतं की, स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे.
त्याबाबत छेडले असता पवार म्हणाले की, एकत्र यायचे की नाही, पुढे कसे जायचे, हे आता खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनीच ठरवावे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा हा प्रश्न नाही, विचारसरणी कधी ना कधी एकच होती, त्याचा हा प्रश्न आहे. मी आता सक्रिय राजकारणात राहणार नसल्यामुळे जो काही निर्णय आहे तो सुप्रिया आणि अजितनेच घ्यावा.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1999 ला सुद्धा वेगवेगळे लढले होते. मात्र निवडणुकीनंतर आम्ही विलासरावांना मुख्यमंत्री केले. माझ्या हाती निर्णय घेण्याचे अधिकार असल्यामुळे युवकांना संधी देण्याला मी कायम प्राधान्य दिले, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचं की, विरोधी पक्षासोबत बसायचं यांचा निर्णयही आता सुप्रिया सुळेंनीच घ्यावा, असं वक्तव्यही पवारांनी केलं होते.