

पुणे: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर आनंदच आहे. असे त्यांनी सांगितले.
सिंचन भवन येथे आयोजित केलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर डॉ विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा एक गट ठरवून बाहेर पडला आहे. आणि आता जर ते एकत्र येत असतील तर आम्ही आक्षेप घ्यावा असे काही नाही. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो त्यांनी घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलनीकरण करावं, किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादी विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. दरम्यान त्यांची विचारधारा नेमकी काय आहे हे त्यांनाच विचाराव लागेल कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे हेच मला माहित नाही असेही ते म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर ताकद वाढेल, असे मत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केले.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचन भवन येथे नियामक मंडळाची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीस राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार ) आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते.या बैठकीनंतर ते पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्या विधनाबाबत विचारले असता त्यांनी सोलापूरचे आम्ही चार आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी यासाठी जयंत पाटील यांना भेटलो होतो. तसेच पवार साहेबांना पण याविषयी बोलणे झाले होते.
अजित पवार यांच्यावर टीका करूनही, त्यांनी मला नेहमी विकासकामांत साथ दिली. माझ्या मतदारसंघात काम केली, पाणी दिले. माझ्या मतदार संघात कामे करताना त्यांच्या मनात कुठेही द्वेष नाही दिसला नाही. मतदारसंघात काम असतात, अडचणी असतात, त्यामुळे सरकारची गरज असतेच असे सांगून जानकर यांनी शेवटी पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असे सांगितले.