

Shiv Sena and NCP Symbol Case: शिवसेनेचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाला मिळणार? तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह आणि नाव कोणाला मिळणार? यावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेला वाद बराच काळ प्रलंबित आहे. आजपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या सुनावणीपूर्वी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. असीम सरोदे म्हणाले की, ''सर्वोच्च न्यायालायने आज मूळ शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु करू असे मागच्या तारखेला सांगून ठेवले होते. अगदी कुणी किती वेळ युक्तिवाद करणार हे सुद्धा सांगितले होते.
आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे. (जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच).
परंतु आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगांबाबत 100 मीटर उंचीच्या पेक्षा जास्त असतील त्यांनाच डोंगर मानणार असा अहवाल सरकारतर्फे कोर्टात दाखल झाला व त्याला तत्कालीन चीफ जस्टीस भूषण गवई साहेब यांनी मान्यता दिली. तो निर्णय पर्यावरण विरोधी असल्याबाबत केसेस वर आज तातडीची सुनावणी दुपारी एक वाजता होणार आहे.
त्यामुळे "शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह" याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही.'' असा अंदाज सरोदे यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्ह वादाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होऊ शकतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज नेमकी सुनावणी होते का, काय दिशा मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.