सातारा : मला दाबण्यासाठी सगळे एकत्र येतात हा जावलीचा विजय : आ. शशिकांत शिंदे

सातारा : मला दाबण्यासाठी सगळे एकत्र येतात हा जावलीचा विजय : आ. शशिकांत शिंदे

मेढा : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा दखल घेत असून शशिकांत शिंदे वाढला की आपल्याला अडचण येईल. यासाठी जिल्ह्याच्या राजकारणात अनेक मंडळी मला झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण 'मै झुकेगा नही साला'. रात्रंदिवस बसून तुझा ऊस नेणार नाही, तुला बघतो, तुला उचलून नेतो, म्हणून तुम्ही निवडणुका जिंकल्या. मला दाबण्यासाठी सगळे एकत्र येतात हा जावलीचा विजय आहे, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. खर्शी बारामुरे येथील एका कार्यक्रमात आ. शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी अमित कदम, एकनाथ ओंबळे, जावली बँकेचे माजी चेअरमन योगेश गोळे, माथाडी कामगारांचे नेते विठ्ठल गोळे, पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री गिरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. शिंदे म्हणाले, मला दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी सगळे एकत्र येतात. हा जावलीचा विजय आहे. त्यांनी कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरी 'मै झुकेगा नही साला'. शशिकांत शिंदे एका बँकेने लहान होणार नाही. सोसायटी निवडणुकीबाबत मला काही बोलायचे नाही. मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही पण पळवायचे काम केले आहे. मी जावलीचा सुपूत्र म्हणून नाव कमवले आहे. शरद पवार यांच्यामुळे वादळातून वाट काढत राष्ट्रवादीचा छोटासा सैनिक म्हणून काम करत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.

जावली बँक कशी चालली आहे? कशा पध्दतीने चालत आहे? याचे सर्व अपडेटस् माझ्याकडे वेळोवेळी आले आहेत. कोणी काय भानगडी केल्या याचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आता आली आहे. वेळ पडल्यावर नक्‍कीच या बँकेत मनमानी आणि भोंगळ कारभार करणार्‍यांची पिसे काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही आ. शिंदे यांनी वसंतराव मानकुमरे यांना दिला. यापुढे आता अपप्रवृत्ती व नौटंकीबाज व्यक्तींच्या हातात बँक जावू देणार नाही. ज्यांच्या ताब्यात ही बँक आहे त्यांना वेळीच जाग येणार नसेल तर अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी ठणकावले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news