

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील क्रिकेटचा विकास खुंटला असून हजारो भावी क्रिकेटपटूंची स्वप्ने उद्ध्वस्त होत चालली आहेत. क्रिकेटसाठी दर्जेदार व अद्ययावत मैदाने नसल्याने या खेळावर विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्याच्या क्रिकेटची हानी रोखण्यासाठी व उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी चळवळ उभी राहण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या जिल्ह्यातील 'क्रिकेटला कुणीतरी वाचवा', अशी आर्त हाक क्रिकेटप्रेमींनी दिली आहे.
सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा डंका सातासमुद्रापार पोहचला आहे. या जिल्ह्याने अनेक नावाजलेले खेळाडू निर्माण केले आहेत. क्रिकेटमध्येही सातार्याने लौकीक मिळवला आहे. मात्र अलिकडच्या बदलत्या स्थितीत क्रिकेटचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर विस्तीर्ण, प्रशस्त मैदान आहे. येथील हिरवीगार टर्फ विकेट गवताची पातीही मोहरुन उठवणारी होती मात्र सध्या इथं गवताचे पातेही उरलेले नाही. या मैदानावरच्या कितीतरी जुन्या आठवणी जुनी-जाणती मंडळी आजही सांगतात. हजारो क्रिकेटपट्टूंनी या मैदानाचा लौकीक वाढवला आहे. बुधवारी या स्टेडियमवर क्रिकेट निवड चाचणी होती. यावेळी राजू जाधव, केतन दोशी, शरद महाजनी, शेखर पवार, मयूर कांबळे, हेमंत गुजर, सतीश फुले, ईर्शाद बागवान ही जुनी मंडळी उपस्थित होती. क्रिकेटच्या बदलत्या स्वरुपावर त्यांच्यामध्ये चर्चा झाली. मैदानाअभावी सीझन बॉलचे क्रिकेट संपल्याची खंत या सर्वांनी व्यक्त केली.
सातारा जिल्ह्यात गुणवान खेळाडूंची खाण आहे. अफाट, गुणवत्ता आहे. पण तिला न्याय देणारी स्पर्धा होत नसल्याचे भीषण वास्तव या ज्येष्ठ खेळाडुंनी व्यक्त केली. नुसत्या नेटमधील सरावाने काय साध्य होणार? परीक्षाच नसेल तर फक्त अभ्यास करुन काय उपयोग? अशी परिस्थिती त्यांनी बोलून दाखवली. क्रिकेटच्या मैदानासंदर्भात आम्ही खूप मनापासून प्रयत्न करतोय, पण यश नाही येत नसल्याचे त्यांनी बोलून दाखवली. सातारा, कराड, वाई, फलटणसारख्या शहरातही क्रिकेटसाठी दर्जेदार मैदाने नसल्याने या खेळाचा विकास खुंटला आहे. बेंबाळेवाडीसारख्या गावात जर चांगलं मैदान, खेळपट्टी होत असेल तर इथे का नाही? असा प्रश्न शरद (अण्णा) महाजनी यांनी उपस्थित केला.
तळमळीने प्रयत्न होण्याची गरज
जिल्ह्यातल्या क्रिकेटसाठी 'गॉडफादर', देवदूत म्हणून कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे. किक्रेटसाठी सर्वस्व अर्पण करणारी माणसं आजही आहेत. पण त्यांच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी. मग ती राजकीय, सामाजिक, आर्थिक, कसलीही असो हा प्रश्न सोडवणे अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी तळमळीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
जिल्ह्यातल्या क्रिकेटसाठी व हजारो भावी क्रिकेटपटूंची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी मदत करायला मी तयार आहे. माझ्या कुवतीनुसार ती करेन. पण हे शिवधनुष्य पेलणारे हजारो हात पुढे यायला हवेत.
– शरद महाजनी