सातारा : पुढारी वृत्तसेवा
जावली तालुक्यातील 9 गावांतील बौद्ध वस्तीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून 1 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 10 विकासकामे मंजूर झाली आहेत.
जावली तालुक्यातील 9 गावांतील दलित वस्तीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे निधीची मागणी केली होती. ना. मुंडे यांनी 10 कामांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल आ. शिवेंद्रराजे यांनी ना. मुंडे यांचे आभार मानले.
म्हसवे येथे बौद्ध वस्ती ते ओढा काँक्रीट गटर करणे, आर्डे येथील पंचशीलनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, बेलावडे येथील अशोकनगर स्मशानभूमी रस्ता व सुशोभीकरण करणे, भिवडी येथील सम्राट अशोकनगर येथे आरसीसी गटर करणे, इंदवली येथील सम्राट अशोकनगर येथे आरसीसी गटर करणे, रानगेघर येथील मागासवर्गीय वस्तीतील रस्ता करणे, सनपाने वरचीवाडी पंचशीलनगर रस्ता काँक्रिटीकरण करणे, खर्शी बारामुरे येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे रस्ता करणे व समता नगर येथे रस्ता करणे तसेच कावडी येथील वसंतनगर अंतर्गत रस्ता करणे या कामांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. तातडीने निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून कामे वेळेत पूर्ण करा आणि कामे दर्जेदार करा, अशा सूचना आ. शिवेंद्रराजे यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या आहेत.