

दहिवडी/वरकुटे मलवडी : पुढारी वृत्तसेवा
मी जलसंधारण सचिव असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून माणमध्ये 75 कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर केले. पण त्याचा कधी ढोल पिटला नाही. कारण ते आमचं कर्तव्य होतं. विरळी खोर्याचं हक्काचं टेंभूचं पाणी विरळीला निश्चितपणे मिळेल आणि ते आम्हीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणणार, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली. तसेच पोलिसांच्या भितीने व्यासपीठावरुन पळून जाणार्यांनी व भानगडी करणार्यांनी जामिनाची चिंता करावी, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
विरळी (ता. माण) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा व कर्तृत्ववान नागरिकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माजी सभापती श्रीराम पाटील, संजय जाधव, दादासाहेब मडके, संजय जगताप, बाळासाहेब काळे, प्रशांत विरकर, विक्रम शिंगाडे, सिध्देश्वर काळेल, संजय खिलारी उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, माजी आमदार (कै.) सदाशिवराव पोळ व (कै.) खाशेराव जगताप यांनी खुप चांगले काम उभे केले. त्यांच्यात काही मतभेद असून सुध्दा एकमेकांचा सन्मान ठेवून समाजासाठी राबणारी ती मंडळी होती. पण नेहमीप्रमाणे आपले लोकप्रतिनिधी संतुलन गेल्याने बरळत असून माण तालुक्याच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य करत आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणी यावर त्यांनी बोललं पाहिजे पण ते बोलत नाहीत. एमआयडीसीची अद्याप अधिसूचना झालेली नाही. पण एमआयडीसीचं खरं श्रेय आमच्या अधिकारी सुपुत्रांचं आहे. अजितदादांनी स्पष्ट सांगितलंय कुणी काही म्हणोत एमआयडीसी माणमधून जाणार नाही. या भागाला आतापर्यंत टेंभूचे पाणी न मिळण्याचं पाप या निष्क्रिय आमदारांनी केलंय. त्यांनी पाण्यासाठी प्रतिष्ठा पणाला न लावता पनवेलला पुनर्वसनाचे भूखंड मिळवण्यासाठी लावली. मग ज्या भानगडी झाल्या त्या तुम्हालाच निस्तराव्या लागणार ना. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांनी मला निर्दोष ठरवलंय. खंडणी व विनयभंगाची तक्रार ज्यांच्यावर आहे त्यांनी जामिनासाठी घाबरावं. जातीचं विष पेरण्याचं काम यांनी केलं. माणसांना उभं करण्याऐवजी त्यांची डोकी फोडण्याचं काम केलं. आंधळी प्रकरणात ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्याची जबाबदारी कोण घेणार? या लबाडाची लबाडी वडूज व दहिवडीतील जनतेनं ओळखली असून आता माण-खटाव मधील गावागावातील जनता ओळखू लागली आहे. त्यामुळे त्यांचं नियंत्रण सुटू लागलं आहे. शिळ्या कढीला ऊत आणणार्यांनी आपण काचेच्या घरात राहतो हे लक्षात ठेवावं, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अभयसिंह जगताप, दादासाहेब मडके, प्रशांत विरकर, विक्रम शिंगाडे, विश्वनाथ नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन शरद गोरड यांनी केले. आभार वैभव गोरड यांनी मानले.
खा. शरद पवारांच्या माध्यमातून वडूज येथे आम्ही जंबो कोविड सेंटर आणले. विविध ठिकाणी चौदा हजार लोकांना कोरोना काळात मोफत औषधोपचार दिले. आमदार महाशय म्हणतात त्यांनी साडेतीन हजार लोकांवर उपचार केले. महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार होत होते. पण लोक म्हणतात मायणीत प्रत्येकाकडून 50 हजार घेतले. मग बघा साडेतीन हजार गुणिले 50 हजार किती रुपये झाले. तुमचं एवढं चांगलं काम होतं तर मग फक्त तुमच्याच मायणी हॉस्पिटलची चौकशी का झाली? असाही सवाल देशमुख यांनी केला.
उरमोडीचं पाणी खरतर खा. शरद पवार, (कै.) अभयसिंह महाराज व आमदार शिवेंद्रराजे यांच्यामुळे आले. सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र भिजायला पाहिजे होतं पण दहा वर्षात फक्त 9 हजार हेक्टरवरच पाणी पोहचले. या निष्क्रियतेला जबाबदार कोण? असा सवालही देशमुख यांनी केला.