खा.उदयनराजे- आ. शिवेंद्रराजे गटाचे कार्यकर्ते भिडले

खा.उदयनराजे-आ. शिवेंद्रराजे
खा.उदयनराजे-आ. शिवेंद्रराजे
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा खरेदी-विक्री संघासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर सोमवारी अर्ज छाननी झाली. यामध्ये आ. शिवेंद्रराजे व खा. उदयनराजे गटातील कार्यकर्ते भिडले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच या दोन गटांमध्ये हमरी-तुमरी व वादावादी झाली. आ. शिवेंद्रराजे गटाने खा. उदयनराजे गटाच्या सर्वच उमेदवारांविरोधात तक्रार केली. अखेर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर यावर सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही गटाच्या वकीलांनी आपापली बाजू मांडली रात्री उशिरापर्यंत ही सुनावणी सुरूच होती.

सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. सोसायट्या झाल्यानंतर 'ब' वर्गातील संस्थांची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सातारा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. अर्ज दाखल झाल्यानंतर सोमवारी छाननी झाली. खरेदी विक्री संघासाठी आ. शिवेंद्रराजे गटाकडून 17 जागांसाठी तर खा. उदयनराजे गटाकडून 14 जागांसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बाबुराव शेळके यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी सुरू झाली.

यावेळी दोन्ही गटातील शेकडो कार्यकर्ते जिल्हा उपनिबंधक कार्यालय व परिसरात दाखल झाले होते. एका एका अर्जाची छाननी सुरू असताना आ. शिवेंद्रराजे गटाने खा. उदयनराजे गटाच्या प्रत्येक उमेदवाराचे रेकॉर्डच सादर केले. आ. शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी खा. उदयनराजेंंच्या गटातील कार्यकर्त्यांच्या उमेदवारी अर्जावर जोरदार आक्षेप घेतला. ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांचे संस्थेत शेअर्स नाहीत. तसेच काहींचे शेअर्स हे अपूर्ण आहेत. याचबरोबर अनेकांनी संस्थेमार्फत त्यांनी खताची खरेदी वा विक्री केलेली नाही. त्यामुळे त्यांनी संस्थेशी व्यवहार झाला नसल्याची हरकत घेतली आहे. या मुद्द्यांमुळे हे सभासद अक्रियाशील असल्याचा आरोप आ. शिवेंद्रराजेंच्या गटाने केला. संचालक पदासाठी इच्छुक असलेल्या सभासदांनी पाच वर्षांत किमान एकदा तरी संघातून एकदा तरी खताची खरेदी किंवा विक्री करावी या नियमावर बोट ठेवून अर्जांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली.

सत्ताधार्‍यांकडून सर्वच अर्जांवर विविध मुद्द्यांवर आक्षेप घेतल्याने वातावरण तंग झाले. संस्थेच्या उपविधीच्या लू-फोल्सचा फायदा उठवत आ. शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खा. उदयनराजे गटातील कार्यकर्त्यांनीही विविध मुद्दे मांडत बाजू रेटण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांमध्येच हमरी-तुमरी व वादावादी झाली. अखेर यावर दोन्ही गटांनी वकील बोलावून प्रत्येक अर्जावर सुनावणी घेण्याची मागणी केली.

छाननीमध्ये जोरदार वादावादी झाल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे. सायंकाळी 5 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बापूराव शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकीलांनी जोरदार युक्‍तिवाद केला. वकीलांच्या युक्‍तिवादानंतर काय निर्णय देतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या सुनावणीच्या निकालावर अपील करण्यासाठी खा. उदयनराजे गटाला तीन दिवसांचा अवधी आहे. या सर्व घडामोडींमुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक रंगतदार होणार आहे.

अंतिम मतदार यादीत नावे आलीच कशी?

सहकारातील कोणत्याही संस्थेची निवडणूक घेण्यापूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. कच्ची प्रारूप मतदार यादी लावून त्यावर इतर सभासद व नागरिकांच्या हरकती व आक्षेप नोंदविले जातात. अंतिम मतदार यादी प्र्रसिद्ध करण्यापूर्वीच संस्थेच्या उपविधीनुसार सर्व बाबी तपासून संबंधित सभासदाचे नाव अंतिम मतदार यादीत घेतले जाते. यामध्ये आक्षेप होऊ शकणारे शेअर्स, थकबाकी, संस्थेशी असणारे व्यवहार या बाबी तपासूनच सभासदाचे नाव अंतिम केले जाते. मात्र, या प्रकरणात मतदार यादीवरील आक्षेप हे अर्ज छाननीत आले आहेत. त्यामुळे ज्या अर्जांवर आक्षेप आले आहेत, त्यांची नावे मतदार यादीत आलीच कशी? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news