कराड नगरपालिका निवडणूक : पक्ष चिन्हासाठी काँग्रेस कार्यकर्ते आग्रही

file photo
file photo

कराड : पुढारी वृत्तसेवा
सुमारे 10 दिवसांपूर्वी जाहीर झालेली कराड नगरपालिकेची प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, असे असले तरी काँग्रेसकडून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चाचपणी सुरू आहे. मलकापूरप्रमाणे पक्ष चिन्हावरच काँग्रेसने कराड पालिका निवडणुकीला सामोरे जावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळेच आमदार पृथ्वीराज चव्हाण हे कोणता निर्णय घेणार? याबाबत उत्सुकता आहे.

कराड दक्षिण हा काँग्रेसचा स्वातंत्र्यापासूनच्या सात दशकांपासूनचा बालेकिल्ला आहे. स्व. यशवंतराव मोहिते, स्व. विलासराव पाटील उंडाळकर आणि सध्यस्थितीत 2014 पासून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. कराड दक्षिणमध्ये मलकापूर आणि कराड या दोन नगरपरिषदा आहेत. मलकापूरवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांची मोलाची साथ मनोहर शिंदे यांना मिळत आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असताना कराड शहरात मात्र काँग्रेस वर्चस्व निर्माण करण्यात आजवर अपयशीच ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत 2009 पासूनचा इतिहास पाहता कराड शहराने नेहमीच काँग्रेस उमेदवारांना आघाडी दिली आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत तर कराड शहराने दिलेल्या मोठ्या आघाडीमुळे आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय सुकर झाल्याचे पाहावयास मिळते.
मागील नगरपालिका निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जनशक्ती आघाडीचे नेतृत्व केले होते. त्यामुळे या आघाडीला बहुमत प्राप्‍त झाले होते. मात्र माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा पराभव झाला होता. या पराभवास जबाबदार असलेल्या काही नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करत राजेंद्रसिंह यादव, जयवंत पाटील या गटांनी आ. चव्हाण गटापासून फारकत घेतली होती.

हा अनुभव लक्षात घेता ऐनवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेस आत्तापासून सावधपणे व्यूहरचना करताना पहावयास मिळते. प्रत्येक प्रभागातील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. त्याचबरोबर प्रभागातील प्रलंबित समस्या, विकासकामे यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर या निवडणुकीत काँग्रेस समर्थक उमेदवारांनी पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे, असा सूरही सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून आवळला जात आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण हेच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळेच त्यांच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आघाडीशिवाय बहुमत सहजशक्य नाही

कराड शहरातील सध्यस्थिती पाहता पालिका निवडणूक तिरंगी अथवा बहुरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही एका राजकीय गट अथवा पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवून बहुमत सहजपणे मिळवणे शक्य होणार नाही. यादव गटाशी काँग्रेसचे जुळण्याची शक्यता फार कमी वाटत आहे. त्यामुळेच लोकशाही आघाडीसोबत निवडणूक लढवल्यास त्याचा दोन्ही गटांना फायदाच होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news