सांगली : व्यवसाय परवान्यातून मनपाच्या तिजोरीत 14 लाख | पुढारी

सांगली : व्यवसाय परवान्यातून मनपाच्या तिजोरीत 14 लाख

सांगली पुढारी वृत्तसेवा :  महानगरपालिका आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या मार्केट लायसेन्स शिबिरात 427 व्यावसायिकांनी व्यवसाय परवान्यासाठी अर्ज दाखल केले. त्यातून 13 लाख 78 हजार 480 रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. या शिबिरात 297 व्यवसायधारकांनी आपल्या व्यवसायाचे नूतनीकरण करून घेतले.

महापालिका क्षेत्रात विना परवाना सुरू असणार्‍या व्यवसायांना महापालिकेचा व्यवसाय परवाना मिळावा, या उद्देशाने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार दि. 14 ते 17 मार्च 2022 या कालावधीत विशेष व्यवसाय परवाना आणि नूतनीकरण शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरास व्यवसाय धारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिरात 782 व्यवसायधारकांनी व्यवसाय परवाना अर्ज घेतला आहे. यापैकी कागदपत्रे पूर्तता करून 427 व्यवसायधारकांनी आपल्या व्यवसायाला परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर 297 व्यवसायधारकांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण करून घेतले आहे.

या शिबिरात एकूण 13 लाख 78 हजार 480 इतके उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले असून यामध्ये सांगली विभागाकडून 8 लाख 88 हजार 480 रुपयांचे उत्पन्न जमा केले आहे.

व्यवसाय परवाना शिबिर यशस्वी करण्यासाठी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, बाबासाहेब गायकवाड, प्रेरणा चव्हाण, ज्योतिराम मेंढे, सोनाली जाधव, अनिल वाघमारे, सचिन सावंत, तर कुपवाडमध्ये नर्मदा कांबळे व टीम आणि मिरजेत मिरजकर आणि टीमने उल्लेखनीय कामगिरी केली. लवकरच सर्व व्यवसायधारकांना त्यांच्या व्यवसाय परवान्याचे वाटप केले जाणार आहे.

व्यवसाय परवाना शिबिरात ज्या व्यवसायधारकांनी आपल्या व्यवसायाचा परवाना काढलेला नाही, मात्र त्यांचा व्यवसाय सुरू आहे. त्यांनी दि. 31 मार्चपूर्वी आपल्या व्यवसायाचा महापालिकेचा परवाना काढून घ्यावा. दि 31 मार्चनंतर महापालिकेचा परवाना नसणार्‍या व्यवसायावर महापालिका अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. आंबोळे यांनी दिला आहे.

Back to top button