

कराड : नाशिकहून मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे सहलीला आलेली खासगी बस पुणे - बंगळूर महामार्गावरील वाठार (ता. कराड, सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावरील उड्डाणपुलावरून कोसळून भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना उड्डाणपुलाच्या कामासाठी काढलेल्या 20 फुटांहून अधिक खोल खड्ड्यात ही बस पडल्याने 34 विद्यार्थी, दोन शिक्षक आणि 5 आचारी असे 41 जण जखमी झाले. यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून अन्य 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. ऋषीकेश पाचोरकर (रा. चांदवड वडेर जि. नाशिक) यांच्यासह प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण, पियुष काळे हे विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. या चौघांसह स्वयंपाक बनविण्यासाठी सोबत असलेले कल्पना गिरे, संगिता ढग, भगवान साळवे, सिंकदर शेख, चिन्मय मोरे हे जखमी आहेत. रोशन परदेशी आणि बाबासाहेब गायकवाड या शिक्षकांना सुद्धा जबर मार लागला आहे. या सर्व 11 गंभीर जखमींवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय बसमधील अन्य 25 विद्यार्थीही जखमी असून त्यांच्या हाताला, पायाला, डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील लेट बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता 11वी. च्या विद्यार्थ्यांची सहल कोकण दर्शनासाठी आली होती. विद्यार्थ्यांसाठी 5 बसेसची व्यवस्था केली होती. यापैकी 2 बसेस विद्यार्थींनींसाठी होत्या. कॉलेजकडून विद्यार्थ्यांना नाष्टा, जेवण देण्यासाठी स्वयंपाक बनविणारे सोबत होते. मध्यरात्री मालवणमध्ये जेवण केल्यानंतर पाचही बसेस पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन कोल्हापूर मार्गे पुण्यातून नाशिकच्या दिशेने जाणार होत्या. गत तीन वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. वाठार येथे महामार्गावर पूर्वीच्या उड्डाण पुलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी पुणे बाजूकडे जाणार्या लेनवर सुमारे 20फुटापेक्षा अधिक खोल खड्डा काढण्यात आला आहे. सहलीच्या पाचही बसेस कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत आल्या. त्यावेळी सकाळी पावणेसातच्या सुमारास भारत संभाजी थेटे यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट पुलाच्या रूंदीकरणासाठी काढलेल्या खड्ड्यात कोसळली. यावेळी मोठा आवाज होऊन परिसरातील लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिकांनी सर्व जखमींना तातडीने कृष्णा रूग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, तहसिलदार कल्पना ढवळे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी आणि रूग्णालयात जाऊन जखमींना तातडीने मदत होण्यासाठी सूचना दिल्या.
वाठारनजीक महामहार्गावरून बस खड्ड्यात कोसळणार, हे लक्षात येताच चालक भारत थेटे याने बसमधून महामार्गावर उडी मारत स्वतःला वाचविल्याचे तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह स्थानिकांनी सांगितले. खासगी बस चालकाने स्वतःला वाचवित उडी मारली; मात्र विद्यार्थ्यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेत ढकलल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.