

कराड : कराड नगरपालिका कार्यक्षेत्रात तब्बल दोन हजारांहून अधिक दुबार मतदार आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. आगामी निवडणुका पारदर्शक व निर्विवाद व्हाव्यात, यासाठी मतदार यादी शुध्दीकरण मोहीम राबविण्यात आली. या अनुषंगाने संबंधित मतदारांच्या कागदपत्रांची खातरजमा करून परिशिष्ट-1 भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मतदानादिवशी दुबार मतदाराकडून परिशिष्ट -2 भरून घेण्यात येणार आहे. यामध्ये मी दुसऱ्या ठिकाणी मतदान करणार नाही, असा संदर्भ असेल.
नगरपालिका तसेच निवडणूक विभागाच्या संयुक्त तपासणी दरम्यान अनेक मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंद असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये काहींची नावे एकाच प्रभागात तर काहींची नावे अन्य प्रभागात आढळून आली आहेत. अशा मतदारांना निवडणूक प्रशासनाकडून नोटीस देऊन आवश्यक कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. तसेच बीएलओ मार्फत त्यांच्या नावांची खातरजता करण्यात आली.
कराड नगरपालिका कार्यक्षेत्रात 1 हजार 998 मतदारांची नावे दुबार आढळल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमानुसार दुबार नाव असलेल्या मतदाराचे अंतिम नोंदणी ठिकाण निश्चित करण्यासाठी त्याच्याकडून बीएलओ मार्फत परिशिष्ट-1 भरून घेण्यात आले आहे. मतदानादिवशी परिशिष्ट -2 भरून घेतले जाणार आहे. या दोन्ही दस्तऐवजांद्वारे मतदाराने स्वतःचा प्रभाग, स्थायी राहण्याचा पत्ता, ओळखपत्र क्रमांक आदी बाबी स्पष्ट करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेनंतर मतदार यादीत संबंधित व्यक्तीच्या नावासमोर ‘दुबारचा शिक्का’ मारण्यात येणार आहे.
कराड शहरात वाढते स्थलांतर, भाडेकरूंची मोठी संख्या, वारंवार पत्ते बदलणे या कारणांमुळे दुबार नावे वाढल्याचे प्रशासनाचे मत आहे. मतदार यादीतील त्रुटींमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. जे दुबार मतदार आढळून येत नाहीत मतदार यादीत त्यांच्या नावापुढे दुबार शिक्का मारला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकी नंतर कराड दक्षिणमधील दुबार मतदारांचा मुद्दा चर्चेत आला होता. कराड शहरातील माजी नगरसेवकांनी कराड शहरात दुबार मतदारांची संख्या अधिक असल्याचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले होते. दोन -दोन प्रभागात मतदारांची नावे नोंदली गेली आहेत. काही मतदार बाहेरून आले आहेत. तर काही स्थलांतरीत झाले आहेत. काही मतदारांचा पत्ता सापडत नाही, अशा स्वरूपांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने निवडणूक शाखेने मतदार शुध्दीकरण प्रक्रिया राबविण्यात आली.