

कराड : सैदापूर (ता. कराड) गावास आसाम राज्याच्या वरिष्ठ पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी त्यांनी सैदापूर येथील 24 बाय 7 नळपाणी पुरवठा योजनेस भेट देऊन पाहणी करत माहिती घेतली. यावेळी सैदापूर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलात बचत करण्याच्या उद्देशाने सैदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून उभारलेल्या सोलर प्रकल्पाची पाहणी, सोलर यंत्रणा व पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.
या शिष्टमंडळात आसाम राज्य पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्राथा बरुहा, जलजीवन मिशनचे संचालक अर्णवकुमार बरुहा, कार्यकारी अभियंता अजोयकुमार लाहोन यांच्यासह आसाम राज्यातील विविध महानगरपालिका व नगरपरिषदेचे एकूण 27 अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सैदापूर 24 बाय 7 नळपाणी पुरवठा योजनेत राबविण्यात आलेल्या आधुनिक मीटर कनेक्शन प्रणाली, रीडिंग घेणे, मासिक बिल वितरण व वसुली प्रणाली या प्रभावी अंमलबजावणीबद्दल अधिकाऱ्यांनी विशेष समाधान व्यक्त करून ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.
या योजनेची सर्व माहिती निवृत्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी उत्तम बागडे, फत्तेसिंह जाधव, पाणीपुरवठा अधिकारी गणेश यादव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कॉन्ट्रॅक्टर प्रवीणकुमार जाधव, एमएसईबी कॉन्ट्रॅक्टर मयूर जाधव यांनी शिष्टमंडळाला दिली. शिष्टमंडळाने ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीची व त्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीबद्दल समाधान व्यक्त करत फत्तेसिंह जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले. याप्रसंगी कराड पंचायत समितीचे उपाधिकारी जयदीप पाटील, माळी, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, ग्रामविकास अधिकारी संजय निंबाळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.