सातारा : पुढारी वृत्तसेवा
गणपतीसह इतर विविध कार्यक्रमांमध्ये झगामगा लायटींग पाडत भलतीच क्रेझ करण्याची हौस सातारा जिल्ह्यातही वाढू लागली आहे. कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेने त्याचे डोळ्यांवर दूरगामी परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे झगामगा अन् लेझरचा बेक्कार धोका ओळखा, अशी पर्यावरणवाद्याकडून हाक दिली जावू लागली आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने गणेशोत्सवांमध्ये डॉल्बी प्रमाणेच गेल्या दोन वर्षात लेसर शोचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मिरवणुकीत झगमगाट, आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ‘लेझर शो’ची क्रेझ दुर्देवाने वाढू लागली आहे. लेझर शो हा घातक असल्याचे पोलिसांकडून वारंवार सांगितले जावूनही त्या सूचनांना फाट्यावर मारले जात आहे. यावर्षी सातारा पोलिसांनी लेझर शो वर बंदी असल्याचे ठणकावून सांगितले. कराडसह इतर ठिकाणी लेझर शो सुरु होण्यापूर्वी त्याचा बाजारही उठवण्यात आला. सातार्यातील ही घटना ताजी असतानाच कोल्हापूरातील लेझर शो मुळे गणेश भक्तांसह पोलिसांना त्याचा त्रास झाल्याचे समोर आले. यामुळे लेसर शो वर बंदी असलेले योग्यच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लेझर किरणांमुळे प्रामुख्याने डोळे लाल होतात. डोळ्याला जळजळ होते. डोळ्यांच्या पडद्याला इजा होते. अति लेझर किरणांमुळे रक्तस्त्राव देखील होतो. लेझर किरणांचे अधिक दुरगामी परिणाम असून गणेश भक्तांसह सातारकरांनी लेझर शोच्या ठिकाणी जाणे टाळलेले सोयीस्कर राहिल.
लेझर हे असे उपकरण आहे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या उत्तेजित उत्सर्जनावर आधारित ऑप्टिकल प्रवर्धन प्रक्रियेद्वारे प्रकाश उत्सर्जित करते. लेझर (लाईट अॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन) हा शब्द एक संक्षिप्त रूप आहे. जो किरणोत्सर्गाच्या उत्तेजित उत्सर्जनाद्वारे प्रकाश प्रवर्धनासाठी वापरला जातो. या लाईटद्वारे रेडिएशन मोठया प्रमाणातून बाहेर पडते. त्यामुळे हे अधिक धोकादायक असते.