दहीहंडीत घातक लेझर लाइटवर बंदी घालण्याचे आदेश सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले होते. मात्र, चौकाचौकात दहीहंडी साजरी करणार्या विविध मंडळांनी ‘लेझर शो’चे आयोजन करून पोलिसांचे आदेश धुडकावून लावले. याप्रकरणी पुणे पोलिसांनी केवळ 4 मंडळांवर गुन्हा दाखल केला आहे.
डीजे लावून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. दणदणाट आणि डोळे दीपवणार्या लेझर लाइटचा त्रास हा सर्वसामान्यांना सहन करावा लागला. पोलिसांच्या नियत्रंण कक्षाकडे वेगवेगळ्या भागातून 12 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शहरातील पाच परिमंडळांपैकी केवळ परिमंडळ दोन आणि परिमंडळ 5 मधील 4 मंडळांवर भारतीय न्याय संहितेच्या 223 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी लेझर बीम लाइट वापरण्याबाबत पुढील 60 दिवस बंदी घातली आहे. तसे आदेश पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी काढले होते. तसेच कारवाईचा इशारादेखील दिला होता.
शहरात मंगळवारी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्याच्या मध्यभागासह उपनगरांत ठिकठिकाणी मंडळांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. येथे डीजेचा कर्णकर्कश आवाज तसेच लेझर लाइटचा वापर करण्यात आला. डोळ्यांना त्रास देणार्या या लेझर लाइटमुळे गेल्या वर्षीदेखील पुणेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच, गणेशोत्सवात यामुळे अनेकांना त्रासदेखील झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बंदीचे आदेश काढले गेले होते. मात्र, यंदादेखील मंडळांकडून पोलिसांचे आदेश धुडकावून सर्रास लेझर लाइटचा वापर केल्याचे पाहायला मिळाले.