घातक लेझर बीम लाइटवर गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. त्यानंतर आता पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पुढील साठ दिवस शहर परिसरात लेझर बीम लाइटचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले.
लोहगाव परिसरात हवाई दलाचा तळ आहे, तसेच नागरी विमानतळ आहे. लेझर लाइटमुळे वैमानिकांचे दिसण्यास अडथळा होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून नियमित आदेश काढण्यात येत असतात. पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारपासून (24 ऑगस्ट) पुढील 60 दिवस लेझर दिव्यांबाबत वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले. संबंधित आदेशाचा भंग करणार्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश शर्मा यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. लेझर लाइटमुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलिस आयुक्तालयात आयोजित केली होती. या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइटचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
दहीहंडी मंगळवारी (27 ऑगस्ट) आहे. दहीहंडीत विविध मंडळांकडून लेझर लाइटचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. यापार्श्वभूमीवर पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी लेझर बीम लाइटवर बंदी घालण्याचे आदेश शनिवारी रात्री दिले. पुढील साठ दिवस शहरात लेझर लाइटचा वापर करण्यास बंदी राहणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून सुधारित आदेश काढण्यात येणार आहे.