

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड शहराला शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तडाखा दिला. यादरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याने ठिकठिकाणची झाडे उन्मळून पडली. कराड शहरासह तालुक्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर पावसाची संततधार कायम राहिल्याने शहरातील रस्ते जलमय झाले होते. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला या पावसाने दिलासा मिळाला आहे.
कराड शहरात सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि सायंकाळी चारच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. कराड पंचायत समितीजवळील मोठे झाड रस्त्यावर कोसळले. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच-पाणी झाले. सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
मुसळधार पावसात शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या निवासस्थानाजवळ विजेचा पोल वाकल्यामुळे तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. तेथीलच पंचायत समितीच्या आवारातील मोठे झाड वादळी वाऱ्यात रस्त्यावर कोसळले. सुदैवाने जीवित व वित्तहानी झाली नाही. भेदा चौकात तमाशा फड मालकांनी राहुट्या लावल्या होत्या. त्या सर्व वादळी पावसात उडून गेल्या आहेत. तर मंडपाचे पडदे फाटल्याने मालकांचे नुकसान झाले आहे.
शिवाजी स्टेडियम रोडलगत दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. कराड बस स्थानकाजवळ जुन्या प्रांत कार्यालय आवारातील मोठे झाडे उन्मळून पडले. या भागात उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
हेही वाचलंत का?