डोंबिवली : रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडले | पुढारी

डोंबिवली : रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे पाकीट चोरीला गेल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली. त्यानंतर या महिलेने ही बाब फलाटावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना सांगितली. यावर पोलिसांनी तात्‍काळ कारवाई करत, सराईत पाकीटमारी करणाऱ्या एका महिलेस अटक केली आहे. मानखुर्द पूर्व येथे राहणाऱ्या तान्हाबाई रावसाहेब पवार (वय 42) या महिलेला चोरी करताना रंगेहाथ पकडले असून, या महिलेचे नाव पोलिस रेकॉर्डवर असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

कर्जत येथे राहणाऱ्या दुर्गा ब्राह्मणे या दुपारी ठाणे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. याचवेळी कल्याण स्थानकात गाडी पोहोचली असता, आपले पैशांचे पाकिट हरवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्‍यांनी त्वरित फलाटावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी रेल्वे डबा तपासला असता, रेकॉर्डवरील महिला आरोपी तान्हाबाई पवार त्यांना दिसल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे हे ब्रह्मणे यांचे पाकीट सापडले.

दरम्यान पवार यांच्यावर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात देखील गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे अर्चना दुसाने यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनावरून पोलीस उपनिरीक्षक भरसट, साळवे तसेच गुन्हे तपास पथकातील पोलीस हवालदार वानखेडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली. अधिक तपास रेल्वे पोलीस अधिकारी करत आहेत.

Back to top button