टोलसाठी एसटी बस रोखल्या; आनेवाडीत तणाव

कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांचा संताप; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मार्ग मोकळा
Satara News
आनेवाडी टोल नाक्यावरील सर्व लेनवर एसटी बसेस अडवण्यात आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास तणाव निर्माण झाला.Pudhari Photo
Published on
Updated on

लिंब : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या एसटी बसेसना राज्य शासनाने टोलची सवलत दिली आहे. असे असताना बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांच्या सुमारे 50 एसटी बसेस आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी टोल देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. दरम्यानच्या काळात भुईंज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बसेस पुढील दिशेने मार्गस्थ केल्या. त्यामुळे अखेर तणाव निवाळला.

Satara News
चाकरमान्यांना 'टोल फ्री'चा अध्यादेश, मात्र टोल नाक्यावर अंमलबजावणीच नाही

गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपला असल्याने कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या कोकणवासीयांची मोठी गडबड सुरू आहे. कोकणात गणेशोत्सवासासाठी जाणार्‍या कार, जीप, एसटी बसेस तसेच इतर वाहनांसाठी महामार्गावरील सर्वच टोलमधून राज्य शासनाकडून सूट देण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री ते पहाटे 2 च्या सुमारास आनेवाडी टोल नाक्यावर एकच गलका उडाला. मुंबई, पुण्याच्या बाजूकडून आलेल्या एस.टी. बसेस कोल्हापूर, कराडवरून खाली कोकणाच्या दिशेने निघाल्या होत्या. या बसेस आनेवाडी टोल नाक्यावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आल्या. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी चालकांकडे टोलची मागणी केली. त्यावर वाहक व चालकांनी कोकणात जाणार्‍या या बसेस असून टोलमाफी असल्याचे सांगितले. मात्र टोल प्रशासनाने शासनाकडून आम्हाला कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगून टोल घेतल्याशिवाय जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. दोन्ही बाजूने ताठर भूमिका घेतली गेल्याने काळोख्या रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली.

Satara News
वडवळ टोल नाक्यावर पेण-खोपोली एसटीची धडक

टोलनाक्यावरील सर्वच लेनवर एसटी बसेस थांबल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे अन्य वाहने अडकून पडल्याने महामार्गावर कोंडी झाली. अन्य वाहन चालक व प्रवाशांनींही संताप व्यक्त केला. एसटीतील गणेशभक्त व प्रवाशांनी तर आक्रमक होवून वाद घालायला सुरुवात केली. या वादावादीमुळे तणावात भर पडली. एकच गोंधळ उडाला. कोण कुणाचे ऐकत नव्हता. हमरीतुमरीने गलका उडाला. हे प्रकरण भुईंज पोलिस ठाण्यापर्यंत गेले. भुईंज पोलिस तातडीने टोल नाक्यावर पोहचले. त्यांनी एसटी वाहक-चालक व टोल प्रशासनाशी चर्चा केली. वाढत जाणारा तणाव, महामार्गावरील कोंडी यामुळे पोलिसांनी तातडीने मार्ग काढला. टोल प्रशासनाला टोल न घेताच एसटी बसेस सोडून देणे भाग पडले. त्यानंतर या बसेस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news