किणी : यंदाही गणपती सणासाठी पुण्या-मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टोल माफी' जाहीर केली. त्याचा अध्यादेश निघून चोवीस तास उलटले, तरी अद्यापही टोल नाका प्रशासनास तशी कोणतीही सूचना मिळाली नसल्याने नाक्यावर वादाचे प्रसंग घडत आहेत.
गणेश चतुर्थीला गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर होणारा उशीर व प्रवास करणे धोकादायक आणि अवघड बनले आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेने गेले तर भरमसाट भरावा लागणारा टोल यामुळे खास गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणार्या भक्तांना गणेशोत्सव काळात गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ५ ते १९ सप्टेंबर या काळात टोलमाफी देण्याची घोषणा केली आहे. कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणार्या गणेशभक्तांच्या कार ,जीप यांसारख्या वाहनांना जाताना व गणेश विसर्जनानंतर परतणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत एसटी बसेसना ही लागू केली आहे.
मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग(राम क्र.४८), मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग(क्र.६६) तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत असल्याचा अध्यादेश बुधवारी (दि.४) काढण्यात आला. याकरिता 'गणेशोस्तव २०२४, कोकण दर्शन' असे स्टिकर जवळच्या पोलीस ठाण्यातून, चौकीतून किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयातून घेणे आवश्यक करण्यात आले आहे. यापूर्वी टोल सवलतीचा हा कालावधी गणेशोत्सवापूर्वी जाताना तीन दिवस आणि गणेशोत्सवानंतर तीन दिवस असा सुमारे पंधरा दिवसांच्या कालावधीत लागू केल्याची घोषणा करण्यात आली होती. याचा लाभ हजारो वाहनधारकांनी घेतला होता.
पुण्याहून निघाल्यानंतर चिपळूणकडे जाणारी वाहने कराडपासून पाटणमार्गे रत्नागिरी, राजापूरला जाणारी वाहने किणी -वाठार वारणानगर- कोडोली मार्गे आंबा घाटातून. देवगड, कणकवलीस जाणारी वाहने कोल्हापूर, गगनबावडा मार्गे करूळ घाटातून तर कुडाळ मालवण सावंतवाडी, गोव्यास व कर्नाटकात जाणारी वाहने आजरा आंबोली मार्गे जात होती. यावर्षीही टोल फ्री सवलतीच्या काळात किणी(जि. कोल्हापूर) व तासवडे (जि. सातारा) यासह महामार्गावरील टोल नाक्यावरून सुमारे दहा हजाराहून अधिक पासधारक वाहने मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. मात्र गणेशभक्त आपापल्या गावी पोहोचले तरी अजूनही टोल फ्री संदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे कोणताही आदेश आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जवळपास ९९ टक्के वाहनांना फास्टॅग आहेत. त्यामुळे टोल फ्रीचे स्टिकर वाहनाला लावूनही टोल नाक्यांवर वाहन आल्यानंतर ऍक्टिव्ह फास्टॅग असणाऱ्या वाहनाच्या टोलची रक्कम त्याच्या खात्यातून वसुल होत असते. यामुळे वाहनधारकाला फास्टॅग डीऍक्टिव्ह करायला पाहिजे किंवा काचेवर लावलेला फास्टॅग काढुन टाकला पाहिजे, असे नसेल तर अशा वाहनांची नोंद ठेवून त्यांची जमा झालेली रक्कम त्या वाहनधारकाला परत करण्याची व्यवस्था केली पाहिजे.