

खोपोली : पेणहून-खोपोलीकडे जाणारी प्रवाशांनी गच्च भरलेली एसटी वडवळ टोल नाक्या जवळ आली असता अनियंत्रित झाल्याने टोल नाक्यावरील लोखंडी खांबाला धडकून अपघाताची घटना मंगळवारी दुपारी घडली.
पेण-खोपोली रस्त्याचे क्राँक्रीटीकरण झाले आहे.रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने सुसाट चालविल्यामुळे अपघात घडत आहेत.त्यातच वडवळ गावाजवळ नव्याने उभारलेल्या टोल नाक्यावर गतिरोधक नसल्यामुळे पेणहून खोपोलीच्या दिशेने भरधाव येणार्या एसटी चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे लोखंडी खांबाला जोरदार धडक दिली.
या धडकेत एसटी बसचे मोठे नुकसान झाले असून चालकासह एक प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे.जखमी प्रवाश्यावर प्रथमोचार करण्यात आले तर प्रवाश्यांना दुसर्या एसटीने खोपोलीकडे पाठविण्यात आले आहे. पेण-खोपोली रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे दररोज अपघात घडत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी व्यक्त करीत आहेत.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात होती. एसटीचा अपघात नक्की कशामुळे झाला याचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी टोल नाक्यावरील भुलभुलय्या लेनमुळे चालकांचा गोंधळ उडत आहे.