Satara Politics BJP Support | सातारकरांना बाहेरच्यांनी तत्त्वज्ञान शिकवू नये

ना. शिवेंद्रराजे भोसले : अमोल मोहिते यांच्यासह भाजप उमेदवारांना साथ द्या
Satara politics BJP support
सातारा : शहरात काढलेल्या सांगता पदयात्रेत सहभागी झालेले ना. शिवेंद्रराजे भोसले, भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते व इतर.Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : तुम्हीही सातार्‍यात राहता आणि मीही सातार्‍यातच राहतो. आपला सर्वांचा शेवट सातार्‍यातच होणार आहे. सातारकर म्हणून आपण सर्वांनी मिळून शहराच्या विकासासाठी एकवटले पाहिजे. बाहेरच्यांनी येऊन आम्हा सातारकरांना तत्त्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारमुळे सातार्‍याच्या विकासासाठी सुवर्णसंधी आहे.

या संधीचा फायदा घ्या आणि सातारा शहराच्या शाश्वत विकासासाठी भाजप उमेदवारांच्याच पाठीशी राहा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारकरांना केले. सातारा नगरपालिका निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अमोल मोहिते आणि नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त सोमवारी गांधी मैदान ते शिवतीर्थ पोवई नाका अशी सांगता पदयात्रा काढण्यात आली.

पदयात्रा मोती चौकमार्गे खालच्या रस्त्याने पोवई नाक्यावर आली. पोवई नाक्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेचे सांगता सभेत रूपांतर झाले. या सभेत ना. शिवेंद्रराजे बोलत होते. याप्रसंगी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, लोकसभा संयोजक सुनील काटकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, डॉ. प्रिया शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, निवडणुकीपुरता ज्यांना सातारकरांचा कळवळा आला आहे, त्या शशिकांत शिंदे यांनी देगाव येथील प्रस्तावित एमएडीसी घालवली, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आज सातारा येथे आयटी पार्क निर्माण होत आहे. शहरातील रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. कास धरणाची उंची वाढवली असून मुबलक पाणी सातारकरांना मिळणार आहे. हद्दवाढ करून उपनगरे आणि त्रिशंकू भाग विकासाच्या प्रवाहात आणला आहे. असंख्य विकासकामे आपण मार्गी लावली आहेत.

अ वर्ग नगरपालिका महानगर पालिका झाल्यास अधिकचा निधी शहराच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे, असे असताना नगराध्यक्ष पदाचे काही अपक्ष उमेदवार अकलेचे तारे तोडताना दिसत आहेत. तीन स्वतंत्र नगरपंचायती केल्या पाहिजेत असे ते म्हणत असतील तर यांना शहराच्या विकासाबद्दल किती कळतं हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सातारकरांनी कोणाचाही विचार न करता भाजपच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावे.

सातारकरांची ताकद महाराष्ट्राला दाखवा...

लोकसभेला आपण सातारकर म्हणून आपली ताकद दाखवून दिली. उदयनराजेंना खासदार करून दिल्लीला पाठवले. आताही भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष सातारा पालिकेच्या निवडणुकीवर आहे. त्यामुळे तुझं माझं न करता, वॉर्डातील भांडण मनात न ठेवता, गटतट न बघता

भाजप उमेदवारांनाच साथ द्या. चुकीचं काही झालं तर काळ आपल्याला माफ करणार नाही याचे भान ठेवून सर्वांनी अमोल मोहिते आणि त्यांचे सहकारी अधिकृत उमेदवार यांनाच मतदान करून पुन्हा एकदा सातारकरांची ताकद महाराष्ट्राला दाखवून द्या, असे आवाहन ना. शिवेंद्रराजे यांनी केले.

सातारकरांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणार : अमोल मोहिते

अमोल मोहिते यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. ते म्हणाले, सातारकरांनो, मी कायम तुमच्या ऋणात आहे. निवडणूक येत-जात असते. विरोधक खोटी आश्वासने व वल्गना करून वातावरण गढूळ करत असतात. मात्र, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर विकसित सातारा दिसत आहे.

Satara politics BJP support
Satara News: निवडणूक आयोगाच्या घनशाघोळामुळे नगरपालिका निवडणुकांचा खेळखंडोबा

विकासकामांचा झपाटा आपण अनुभवत आहोत. तुमच्या स्वप्नातील सातारा उभा करण्याचा चंग दोन्ही राजेंनी बांधला आहे. त्याला भाजपच्या नेतेमंडळींची भक्कम साथ लाभत आहे. त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहुया. तुमच्या हक्काचा माणूस म्हणून मला काम करण्याची संधी द्या. ना. शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला कदापि तडा जावू देणार नाही. अखेरच्या श्वासापर्यंत दोन्ही राजेंसाठी, माझ्या सातारकरांसाठी लढत राहिन, असेही अमोल मोहिते म्हणाले.

Satara politics BJP support
Satara Cold Wave: जिल्ह्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news