

सातारा : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अत्यंत घाईगडबडीत जाहीर केल्याने अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आयोगाकडून वारंवार वेगवेगळे आदेश काढल्याने घनशाघोळ निर्माण झाला. सतत निर्णय बदलल्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा? असा प्रश्न निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उमेदवारांनाही पडला असून जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून 10 नोव्हेंबरला आचारसंहिता जारी होईल असा अंदाज होता. नगरपालिकांची मतदान केंद्रे अंतिम झालेली नसताना मतदान यादी कार्यक्रम पूर्ण होताच अत्यंत घाईगडबडीत राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरलाच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि एका महिन्यात निवडणूक उरकण्याचा घाटच घातल्याचे चित्र त्यानंतर समोर आले. सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड नगरपालिका व मेढा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम व निवडणुकीसंबंधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी वेळोवेळी काढलेली आलेली पत्रे यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
राजकीय नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्षांमार्फत मुख्य उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र स्वीकारताना पर्यायी उमेदवार असलेल्या उमेदवाराने पक्षातर्फे नामनिर्देशनपत्र सादर केल्यास करायच्या कार्यवाहीबाबत दि. 17 नोव्हेंबरला पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. 18 नोव्हेंबरला हे पत्र रद्द करण्यात आले. मात्र, तोपर्यंत जिल्ह्यातील बऱ्याच पालिकांमध्ये पहिल्या पत्रानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली होती. छाननी प्रक्रियेतही अशाच अचानक सूचना देण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला. तसेच दोन दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारास अचानक मुदतवाढ देण्यात आली. निवडणूक कार्यक्रमानुसार माघार प्रक्रियेनंतर अपक्ष उमेदवारांना उशिरा चिन्ह वाटप झाले. त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळच मिळाला नसल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे यावेळी झालेल्या नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुकीत आयोगाचा घनशाघोळ दिसून आला. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक लढवणारे उमेदवारही गोंधळल्याचे चित्र आहे.
सावळ्या गोंधळाचा सिलसिला सुरूच...
निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीतील पुढील टप्प्यांचे नियोजन करायचे की अचानक आयोगाच्या आलेल्या पत्रानुसार पुढील कार्यवाही करायची? असा प्रश्न निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला होता. योग्य नियोजन नसल्यामुळे राज्यातील बऱ्याच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. मात्र, अद्यापही हा सिलसिला थांबलेला नाही. सातारा जिल्ह्यातील फलटण व महाबळेश्वर पालिकेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे या दोन पालिकांबरोबरच अन्य पालिकांची मतमोजणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, गेली नऊ वर्षे रखडलेल्या नगरपालिका तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका अत्यंत घाईगडबडीने का उरकल्या जात आहेत? असा प्रश्न मतदारांनाही पडला आहे.