

सातारा : नोव्हेंबरच्या मध्यावर वाढलेली थंडी वातावरणातील बदलामुळे काही दिवस कमी झाली होती. मात्र आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला आहे. रविवारी साताऱ्याचा पारा 13 तर महाबळेश्वरचे तापमान 9 अंशापर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे अवघे जनजीवन गारठले आहे.
या वर्षी वातावरणातील बदल, लांबलेला परतीचा पाऊस यामुळे अभ्यंगस्नानाला थंडीचा मागमूस नव्हता. नोव्हेंबरच्या मध्यावर अचानक जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली. आठवडाभरानंतर मात्र पुन्हा तामानात वाढ झाली. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली होती. दुपारी कडक उन्हामुळे गर्मी जाणवत होती. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. तापमानाचा पारा घसरुन हवेत गारठा वाढल्यामुळे अवघे जनजीवन गारठले आहे. पहाटेच्या वेळी थंडीने हुडहुडी भरत आहे. रात्रपाळीत काम करणारे कमगार, वृत्तपत्र विक्रेते व इतर कष्टकऱ्यांंनी थंडीपासून बचावासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या होत्या.
दरम्यान, रविवारी साताऱ्याचे तापमान किमान 13 व कमाल 29 इतके तर महाबळेश्वरचे तापमान किमान 9 व कमाल 26 अंश इतके नोंदवण्यात आले. जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने लहानग्यांसह ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांना त्रासदायक ठरत आहे. अचानक वातावरणातील हा बदल अनेकांच्या आरोग्यासाठी पचनी पडला नसल्याने सर्दी, खोकल्यासारखे आजार बळावले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. थंडीत शरीरयष्ठी बनवणाऱ्यांकडून व्यायामाला प्राधान्य दिले जावू लागले असून निरोगी आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दीही सातारा शहर व परिसरातील रस्त्यांवर दिसू लागली आहे. दरम्यान, थंडी वाढल्याने गरम व उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.