

सातारा : दौलतनगर, ता. पाटण येथील कारखाना परिसरामध्ये शिवाजीराव देसाई यांचे स्मारक व पुतळा लोकवर्गणीतून बसवला त्याला विविध उद्योगसमूह, कामगार व शेतकर्यांनी पैसा दिला आहे. सन 1988 ला हा पुतळा उभा राहिला. शासनाचा एकही रुपया त्या स्मारकातील पुतळ्यासाठी आम्ही घेतलेला नाही, असे प्रत्युत्तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे वडील शिवाजीराव देसाई यांच्या स्मारकासाठी शासकीय पैसा वापरला जात असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, माझ्या वडिलांचे निधन जुलै 1986 ला झाले आहे. दोन वर्षानंतर 1988 साली दौलतनगर येथे बाळासाहेब देसाई साखर कारखाना परिसरामध्ये त्यांचा पुतळा लोकवर्गणीतून बसवला. आम्हाला शेतकरी, उद्योग समूह, शिक्षण समुहातील कामगारांनी पैसे दिले. सन 1988 ला हा पुतळा उभा राहिला. त्या स्मारकातील पुतळ्यासाठी शासनाचा एकही रुपया आम्ही घेतलेला नाही.
नंतरच्या काळात सन 2004 ला आमदार झालो. तेव्हा दौलतनगर परिसर हा पर्यटन विकास व तिर्थक्षेत्र विकास या दोन्ही योजनेमध्ये समाविष्ट झाला. दौलतनगरला शताब्दी स्मारक, गणपती मंदिर, गार्डन, सांस्कृतिक भवन, क्रिडांगण, लहान मुलांसाठी प्ले ग्राऊंड, नाना नानी पार्क या सर्व गोष्टींमुळे तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासमध्ये आले. वेगवेगळ्या योजनामधून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभारली. स्मारक आणि पुतळा यासाठी एकही पैसा सरकारचा न घेता तो उभारला आहे. अपुर्या माहितीच्या आधारे विश्वविख्यात प्रवक्त्यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी एकदा दौलतनगरचा परिसर बघायला यावे मग तुम्हाला कळेल की कुठल्या योजनेतून कोणते काम झाले आहे.
पाटणचा विकास जास्त होत आहे अशी तुमच्यावर टिका होत आहे. या प्रश्नावर बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, माझ्यावर अशी टिका कोणी केली नाही. मात्र सत्यजित पाटणकर काहीही नैराश्यातून बोलत आहेत. त्यांनी एका मोठ्या पक्षात प्रवेश केला असला तरी ते उभारी घेवू शकले नाहीत. विधानसभेला पराभवाचा धक्का बसला आहे त्यातून ते अजून सावरलेले नाहीत. त्यामुळे ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. लोकं हुशार आहेत, उघड्या डोळ्यांनी मतदारसंघातील विकास कामे बघत आहेत. ते असेच बोलत राहिले तर त्यांची बिकट अवस्था स्थानिक स्वराज्य संस्थेत होईल.
सातार्यातील ऐतिहासिक राजवाड्याबाबत बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, हा राजवाडाही पुरातत्त्व विभागाकडे आहे. याबाबत सातार्यातील राजघराण्याशी आम्ही चर्चा करु. राजवाड्याबाबत राजघराण्यांचे काय मत आहे हे विचारात घेऊ. केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे त्याबाबत पाठपुरावा करू.