

सातारा : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेमुळे अनेक गट व गणांमध्ये इच्छुकांचे मनसुबे उधळले असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी झालेल्या गावांच्या अदलाबदलीमुळे अनेकांची कोंडी झाली. त्यामुळे इच्छुकांना पुन्हा नव्याने समीकरणे जुळवावी लागणार आहेत. ‘गणानं घुंगरू हरवलं अन् गटाला मुंगळा डसला’ अशी अवस्था पुनर्रचनेत झाली असून गावोगावच्या पारासह मंदिरामध्ये गप्पांचे फड रंगले आहेत.
जिल्हाधिकार्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे 65 गट व 130 पंचायत समिती गणांचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे. गट गणांच्या पुनर्रचनेत फलटणला बरड, कोरेगावला कुमठे आणि खटावला कातरखटाव या तीन गटांची नव्याने निर्मिती झाली आहे. तर कातरखटाव, दरूज, ल्हासुर्णेे, बरड, दुधेबावी या गणांची वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील वनवासवाडी व शाहूपुरी हे दोन गट व चार गण कमी झाले. या बदललेल्या रचनेमुळे नागठाणे व वर्णे गटातील काही मोठी गावे एका गटातून दुसर्या गटात गेली आहेत. तर अन्य तालुक्यातील गट गणांची स्थिती 2017 च्या रचनेनुसार कायम राहिली आहे.
जुन्या गट व गणांची नावे बदलण्यात आली आहेत. गट व गणातील गावांची आदलाबदलही झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे मनसुबे उधळले आहेत. गावांच्या आदलाबदलीमुळे अनेकांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इच्छुकांना पुन्हा नव्याने गट व गणांमध्ये राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत. गट व गणांची अंतिम रचना आयोगाकडून जाहीर झाल्यानंतर खर्या अर्थाने गावोगावी निवडणुकीला रंगत येण्यास सुरूवात झाली आहे. इच्छुकांनीही सार्वजनिक कार्यक्रमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गट व गणामध्ये विविध पक्षाकडून खात्रीशीर व प्रभावी उमेदवारांचा कानोसा काही राजकीय पदाधिकारी घेताना दिसत आहेत.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, अगामी निवडणुकीत सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट, भाजपा व अन्य पक्षांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.