

सातारा : मैत्रिणीने रिलेशनशिप तोडल्याने संतप्त झालेल्या युवकाने मध्यरात्री युवतीच्या घरी जाऊन थयथयाट करत युवतीच्या वडिलांना धक्काबुक्की केली. या ड्रामावेळी संशयिताने युवतीला अश्लील शिवीगाळ करत ‘तुला फार जड जाणार आहे. तुला बघून घेतो’ , असे म्हणत धमकी दिली. साताऱ्यातील घडलेल्या या घटनेनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निशांत नितीन चव्हाण (रा. राजवाडा परिसर, सातारा) या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. युवती तिच्या घरी असताना संशयित निशांत चव्हाण तेथे गेला. संशयित घरात जाताच युवतीच्या वडीलांना त्याने धक्काबुक्की करत दहशत निर्माण केली. आरडाओरडा झाल्याने युवती तेथे आली. संतापलेल्या निशांत चव्हाण याने युवतीला पाहून तिला अश्लिल शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक जमले. या घटनेनंतर युवतीला धमकावत संशयित तेथून पसार झाला.
घरात घुसून वडीलांना धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने युवतीने शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयित युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटने अगोदर देखील संशयित युवकाने युवतीला त्रास दिल्याने युवतीने अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिलेली आहे.
शिक्षणामुळे ब्रेकअप झाले
संशयित युवकाने हंगामा केल्याने युवतीसह तिचे कुटुंबीय भयभीत झाले आहे. युवतीची व युवकाची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. मात्र युवती शिक्षणासाठी परगावी जाणार असल्याने दोघांमध्ये ब्रेकअप झाले होते. तरीही संशयित युवक अधूनमधून युवतीला फोन करत होता. मात्र शिक्षणामुळे फोन घेणे शक्य होत नव्हते. यातूनच संशयित युवक अधिक चिडला. यातूनच हे कृत्य झाले.