

धुळे: परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. साक्री तालुक्यातील शेलबारी घाट परिसरात सापळा रचून तब्बल ७१ लाख ७३ हजार ८६४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. शिरपूर बिटचे दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, शेलबारी शिवारात पथकाने पाळत ठेवली होती.
नाशिककडून पिंपळनेरच्या दिशेने येणाऱ्या तीन संशयास्पद वाहनांना (दोन टोयोटा आणि एक किया) पथकाने थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पथकाला पाहताच चालकांनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली आणि अंधाराचा फायदा घेत जंगलात पळ काढला.
तपासणी दरम्यान वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्यसाठा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
विदेशी मद्य: रॉयल स्टॅग, ब्लेंडर प्राईड, मॅजिक मोमेंट्स यांसारख्या नामवंत ब्रँड्सचे मद्य आणि बिअर (किंमत: ₹१४,७३,८६४/-)
वाहने: २ टोयोटा आणि १ किया कंपनीची वाहनं (किंमत: ₹५७,००,०००/-)
एकूण मुद्देमाल: ₹७१,७३,८६४/-
या प्रकरणी फरार चालक आणि वाहन मालकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवान अमोल धनगर यांनी फिर्याद दिली असून, दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत नागरिकांना काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.