

Raid on illegal prostitution racket in Rajur; goods worth Rs 65,000 seized
जालना, पुढारी वृत्तसेवाः हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील राजूर येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत पती-पत्नीला अटक केली आहे. या कारवाईत एका पीडित महिलेसह डमी ग्राहकाला रंगेहाथ पकडत सुमारे ६५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजूर येथील वस्ती परिसरात गणपत रामधन सेठी व त्याची पत्नी हे आपल्या घरामध्ये बाहेरून महिलांना बोलावून देहव्यापार चालवत असल्याची गोपनीय माहिती हसनाबाद पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहेर यांनी डमी ग्राहक पाठवून खातरजमा केली.
त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस पथकाने दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. छाप्यात एका पीडित महिलेसह आरोपी पती-पत्नी देहव्यापार करताना मिळून आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईत ५,४०० रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन (किंमत अंदाजे ६०,००० रुपये) असा एकूण ६५,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र राजूर ठिकाणी अवैध वेश्याव्यवसाय चालत असल्याने भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. यावर कारवाई झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काटकर, हसनाबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय अहिरे, फौजदार अर्चना भोसले, पोलिस अंमलदार नरहरी खार्डे, रामेश्वर सिनकर, दीपक सोनुने, नारायण चरावंडे, प्रकाश बोर्डे आदींच्यावतीने करण्यात आली.