सातारा : ग्रा.पं. निवडणुकीत उदयनराजे, महेश शिंदे यांचा करिश्मा; खेडमध्ये शशिकांत शिंदे यांचा पाडाव

Mahesh shinde
Mahesh shinde

कोडोली : पुढारी वृत्तसेवा: सातारा तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येणार्‍या खेड या मोठ्या ग्रामपंचायतीसह गोजेगाव ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारली. संभाजीनगरमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या पॅनेलला आमदार महेश शिंदे यांची साथ होती. येथे खा. उदयनराजेंचा करिष्मा कामी आला. खिंडवाडी खा. उदयनराजे भोसले गटाकडे तर चिंचणेर सं.निंब ही ग्रामपंचायत आमदार शशिकांत शिंदे गटाकडे राहिली. उपळी ग्रामपंचायतीवर अपेक्षेप्रमाणे आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाने बाजी मारली.

सातारा तालुक्यातील खेड, संभाजीनगर, उपळी, खिंडवाडी, गोजेगाव, चिंचणेर संमत निंब या ६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी चुरशीने ६८.४६ टक्के मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींसाठी १७ हजार ८९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.

खेड ग्रामपंचायत आ. महेश शिंदे गटाने काबीज केली

सातारा शहरालगतच्या सर्वांत मोठ्या खेड ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटाचा झेंडा फडकला. त्यांच्या खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवला असून सरपंचपदही काबीज केले आहे. तर आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील व आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थकांच्या खेड ग्रामविकास पॅनेलचा मानहानीकारक पराभव झाला. त्यांना अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. आ. महेश शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या ताब्यातील खेड ही बलाढ्य ग्रामपंचायतही काढून घेतली.

संभाजीनगर ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा एकदा खा. उदयनराजे गटाकडे

संभाजीनगर ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा एकदा खा. उदयनराजे भोसले गटाने काबीज केली. येथील १७ पैकी ९ जागा उदयनराजे गटाने जिंकल्या. सरपंचपदीही त्यांच्याच गटाची वर्णी लागली. खा. उदयनराजेंचा म्हणूनच कार्यरत असलेल्या तांगडे गटाने ४ जागा पटकावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. तर अन्य २ ठिकाणी अपक्ष विजयी झाले. चिंचणेर सं. निंब ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे गटाकडे कायम राहिली. येथील ९ पैकी ६ जागा त्यांच्याकडे आल्या. तर ३ ठिकाणी आ. महेश शिंदे गटाने शिरकाव केला. सरपंचपद आ. शशिकांत शिंदे गटाने जिंकले.

खिंडवाडी ग्रामपंचायतीवर खा. उदयनराजे भोसले यांनी सुनील काटकर यांच्या मदतीने झेंडा फडकवला. येथील ११ पैकी ८ जागा व सरपंच पद त्यांनी जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. आ. शशिकांत शिंदे यांच्या गटानेही या ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे. तर आ. महेश शिंदे गटाला ३ जागा पदरात पाडता आल्या.

गोजेगाव ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे गटाचे वर्चस्व

गोजेगाव ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे गटाने सरपंच पदासह आपले वर्चस्व सिद्ध केले. ७ पैकी ४ जागा आ. महेश शिंदे गटाने पटकावल्या. तर ३ जागा आ. शशिकांत शिंदे गटाकडे गेल्या. उपळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सर्व ७ जागा आ. शिवेंद्रराजे भोसले गटाने निर्विवादपणे जिंकल्या. या ग्रामपंचायतीवर यापूर्वीही आ. शिवेंद्रराजे गटाचेच वर्चस्व राहिले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news