राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी : राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुचर्चित फॉस्ककॉन प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी आज नागपुरात केली आहे. विदर्भ दौर्‍यावर असताना त्यांनी आज रवीभवन येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल करत नेमकं कुठं विस्कटलं याची चौकशी व्हावी, असं राज ठाकरे म्हणाले. सध्या राज्यात गाजत असलेल्या फॉस्ककॉन प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. फॉस्ककॉन प्रकरणाची चौकशी व्हावी असंही राज ठाकरे म्हणाले. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी असं ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की, राजकारण वैयक्तिक नसतं, वैचारिक धोरणांवर मी टीका करतो. माझा काय धोरणांना विरोध होता. पंतप्रधान मोदींवरही वैयक्तिक टीका केली नाही, त्यांच्या धोरणांवर टीका केली, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. मनसेने मविआ सरकारचं कधीच कौतुक केलं नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असंही ते म्हणाले.

वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर राजकीय पक्षांकडून राजकारण

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, विदर्भातील खऱ्या प्रश्नांना बदल देत काही राजकीय पक्षांकडून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर वेळोवेळी राजकारण करण्यात येते. मात्र विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा आहे का? एकदा जनतेला हा प्रश्न विचारावा त्यानंतर निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अनेक राजकीय पक्षांकडून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर जनतेला भ्रमित करण्यात येते. खरंच वेगळ्या विदर्भाची गरज आहे की, इतर महत्त्वाचे मुद्दे राज्यासमोर आहे याचा विचार करण्याची गरज असल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले. तसेच विदर्भ आमच्यासाठी महाराष्ट्राचा एक भाग असल्याचे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिकाही स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचे कधीच कौतुक केले नाही

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या राज्यातील सरकारची स्तुती किंवा कौतुक मनसेने कधीच केले नाही. मात्र तरी काही वृत्तपत्र आणि माध्यमांद्वारे खोट्या बातम्या पेरण्यात येतात. ही माहिती आपण कुठून आणली. कोणी सांगितली हे तरी वाचकांना सांगा. आम्ही कधीच उद्धव ठाकरे सरकारचे कधीही कौतुक केले नसल्याची स्पष्टोक्ती राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्रात छापलेल्या वृत्ताचे खंडन करताना केले. तसेच लोकांमध्ये संभ्रम पसरवू नका, असा टोलाही लागावला.

नितीन गडकरी यांचे कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे व्हिजन खूप भव्य आहे. म्हणजे ते छोट्या गोष्टींची कल्पनाच करत नाही. त्यांचे जे काही विचार असतात ते ऐकताना स्वप्नच वाटतात. मात्र सत्यात उतरल्यावर त्यावर विश्वास होतो. अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. तसेच नितीन गडकरी आणि माझे संबंध वैयक्तिक आहे. त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या भेटीचे वेगळे अर्थ लावून घेऊ नका असे स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिले. रविवारी सायंकाळी राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. तसेच नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या फुटाळा सौंदर्यीकरणाचे कौतुकही केले.

बावनकुळे यांची भेट

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी सोमवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतली. तसेच ही भेटही वैयक्तीक असल्याचे सांगून राजकीय चर्चा होणार नसल्याची प्रतिक्रीया दिली. मात्र गेल्या काही दिवसात भाजपच्या नेत्यांसोबतच्या वाढलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरण बदलणार असल्याची चर्चा आहे.

नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त, लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार

नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही सांगितले. नागपूर महानगरपालिकेत अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे. प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याशिवाय मोठं होता येत नाही. त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध लढू आणि पक्षाला नक्कीच नागपूरकर साथ देतील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news