

कोरेगाव : भोसे (ता. कोरेगाव) येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान अभिजित संजय माने (वय 32) यांना उत्तर प्रदेशातील बबिना येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली. त्यांच्या अकाली निधनामुळे भोसे गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. जवान अभिजित माने यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देशसेवेचा ध्यास घेत अभिजित माने 2013 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. ते भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. सोमवारी कर्तव्यावर असताना ते परेडसाठी दाखल झाले होते. त्यावेळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावाचे जवान म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाडळी (ता. सातारा) येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी थेट सैन्य सेवेचा मार्ग स्वीकारत देशाच्या रक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा व बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष काळाने हिरावून नेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजित माने यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. मंगळवारी सकाळी पार्थिव भोसे येथे दाखल होणार असून त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.