

कराड : अल्पवयीन मुलीकडे पाहून हातवारे केल्याचे कारण सांगत कराडमधील प्रीतिसंगम बाग परिसरात जमावाने धार्मिक शिक्षण देणाऱ्यास जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर कराड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच मध्यरात्रीपर्यंत मोठा जमाव शहर पोलीस ठाण्यात परिसरात अक्षरशः ठिय्या मांडून होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार कारी शेरखान सिराज नदाफ (वय 35, रा. बैलबाजार रस्ता, मलकापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नदाफ यास मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारीही शहर व परिसरात सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस ठाण्यातील दाखल फिर्यादीसह प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी प्रीतिसंगम घाटावर आई व इतर नातेवाईकांसोबत आलेल्या एका अल्पवयीन मुलीकडे पाहून धार्मिक शिक्षण देणाऱ्या नदाफ यांनी हातवारे केले. यावेळी तिची आई एका हातगाडा व्यावसायिकास बील देत होती. हातवारे केल्याने संबंधित मुलगी घाबरली होती. तिने हा प्रकार सांगितल्यानंतर मुलीच्या आईने संबंधितास जाब विचारला. पळून जाण्याचा केलेला प्रयत्न, मुलीने आईला सांगितलेली माहिती आणि नदाफकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मुलीच्या आईने नदाफला अक्षरशः चप्पलने मारहाण केली. त्यानंतर हा प्रकार पाहून तेथे जमलेल्या नागरिकांनीही नदाफ यांना मारहाण केली. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच प्रितीसंगम घाट व पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव जमला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना बंदोबस्त व फिरत्या गस्तीसाठी पाठवले. जमावाशी थेट संवाद साधत कायद्यानुसार कठोर कारवाई होईल, असे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री जमाव पांगला. दरम्यान, नदाफ यास मारहाण प्रकरणी हरुण तांबोळी (रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
या फिर्यादीनुसार विनायक मोहिते, श्रेयस यादव, गणेश बुरशे, रुद्र यादव, संग्राम शिंदे, शुभम पवार, आनंद चव्हाण, बंडी वाघ, बंटी वाघ याचे दोन भाचे व अन्य अशा दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हातवारे केल्याचा दावा करणाऱ्या तक्रारदार मुलीस समोर बोलवा, असे म्हणत आपण पोलीस ठाण्यात फोन केला. त्यानंतर नदाफ यास मारहाण करणाऱ्यांनी पळ काढला, असा उल्लेख तांबोळी यांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. मारहाणीत नदाफ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.