

वरकुटे-मलवडी : कुकुडवाड ते मायणी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूरज संजय माने (वय 30, रा. म्हसवड) हे इलेक्ट्रिक दुचाकी (क्र. एमएच 11 डीएस 1806) घेऊन खटाव-माण अँग्रो शुगर फॅक्टरी, पडळ येथे कामावर जात होते. दरम्यान, समोरून निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर (क्र. एमएच 11 बीझेड 1360) ला जोडलेल्या उसाच्या ट्रॉलीची पिन तुटल्याने ट्रॉली मागील बाजूस घसरून आली. ट्रॉली थेट पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर आदळली. या धडकेत सूरज माने यांना गंभीर जखमा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक भारत विठ्ठल शिंदे (रा. ढाकणी, ता. माण) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस हवालदार खाडे करत आहेत.