

मीना शिंदे
सातारा : सहित्य संमेलनाने स्त्री चळवळीला बळकटी देण्याचेच काम केले. बालवाचकांशी हितगुज, बालमंच, प्रकाशक कट्टा, गझल कट्टा, कवी कट्टा यासह विविध व्यासपीठांची सूत्रही महिलांनी स्वीकारली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये महिलांना त्यांचे विचार अन् साहित्यालाही उत्तम व्यासपीठ मिळाले. संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनालाच माजी संमेलन अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची उपस्थिती तर परिसंवाद, कविसंमेलनात महिला अग्रस्थानी राहिल्या.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवीसंमेलनामध्ये महिला कवींची संख्या लक्षणीय होती. तर ‘स्त्रीवादी चळवळीची 50 वर्षे- मागे वळून पाहतांना’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. गीताली वि. म. यांनी स्त्रीवादी चळवळीचा वेध व झालेल्या वैचारिक गोंधळाचा धांडोळा घेत आपली मते व्यक्त केली. या परिसंवादात सुचिता खल्लाळ, हिना कौसर खान, डॉ. सविता मोहिते, डॉ. गायत्री शिरोळे, डॉ. संध्या राजन, डॉ. अंजली ढमाळ, नमिता कीर या महिला साहित्यिक सहभागी झाल्या होत्या. परिसंवादाच्या निवेदकाची भूमिका वैदेही कुलकर्णी यांनी पार पाडली.
दरम्यान, स्त्रियांकडे बघणारी व्यवस्था आणि मानस अजूनही बदलेले नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली. तसेच स्त्रियांना घरकामाचा मोबदला देण्याबद्दल अजूनही एकमत होत नाही. स्त्रियांच्या मातृत्व शक्तीची क्षमता अमूल्य आहे. तरीदेखील घर दोघांचे असते, तर घरातील कामाची जबाबदारीही विभागली जाण्याची अपेक्षा या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर व्यक्त करण्यात आली. तसेच स्त्री आणि पुरुष सर्व स्तरातील लैंगिक वर्गाला माणूस म्हणून संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे मत महिला साहित्यिकांनी व्यक्त केली. गायत्री शिरोळे यांनी स्त्री चळवळी बाबत तर डॉ. अंजली ढमाळ यांनी महिला धोरण व प्रशासकीय व्यवस्थेत काम करण्याची संधी, सुपरवुमन होण्याचा नादात स्त्रियांचे व्यवस्थात्मक शोषणयाबात मत व्यक्त केले. डॉ. सविता मोहिते यांनी वैद्यकीय व्यवस्थेत काम करतांना स्त्रिया स्वतःला व्यवस्थेत किती दुय्यमत्व देतात, याचे अनुभव सांगितले.
राजकीय व्यवस्था आणि बचतगटाच्या चळवळींना स्त्रियांना आत्मभान दिले आहे, मात्र ही चळवळ प्रगल्भ करण्यासाठी सामाजिक जाणीवा आणि स्त्री विषयक कायद्यांची डोळ्यात तेल घालून अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सुचिता खल्लाळ यांनी स्त्रियांचे सर्वत्र होणारे वस्तुकरण आणि विकास, प्रगतीच्या गोंडस नावाखाली स्त्रियांचा होणारा वापर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.