

योगेश चौगुले
स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीतून
सातारा : साताऱ्यात पार पडलेले 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ ग्रंथ, चर्चा आणि भाषणांपुरते मर्यादित न राहता लोकपरंपरेच्या जिवंत आणि स्पंदनशील रूपाचे दर्शन घडवणारे ठरले. आधुनिक साहित्याच्या चौकटीबाहेर जाऊन लोकजीवनाच्या मुळाशी असलेल्या कला, परंपरा आणि अभिव्यक्ती यांना या संमेलनाने केंद्रस्थानी आणले. त्यामुळे हे संमेलन एक प्रकारे ‘लोकसंस्कृतीचा उत्सव’ ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
साहित्यनगरीत प्रवेश करताच वातावरणात एक वेगळाच उत्साह जाणवत होता. ‘फोक आख्याना’च्या माध्यमातून हलगी, संबळ यासारख्या पारंपरिक वाद्यांच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला होता. या वाद्यांचे सूर म्हणजे केवळ संगीत नव्हते, तर ग्रामीण जीवनातील आनंद, दुःख, संघर्ष आणि उत्सव यांचा हुंकार होता. या संमेलनाने ग्रामीण जीवनातील लोपपावत चाललेल्या लोककलेला नवसंजीवनी दिली. काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या या लोकवाद्यांना संमेलनाच्या मुख्य प्रवाहात आणून आयोजकांनी लोकपरंपरेविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ‘फोक आख्याना’ने झालेली सांगता ही विशेष अर्थपूर्ण ठरली. लोककथा, दंतकथा, ऐतिहासिक प्रसंग आणि सामाजिक वास्तव यांचे मिश्रण असलेल्या या आख्यानांनी प्रेक्षकांना भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील सेतूवर नेऊन ठेवले. पोवाडे, गोंधळ, गवळण, लावणी, ओव्या आणि अभंग अशा विविध लोकप्रकारांतून मराठी भाषेची ताकद, लवचिकता आणि अभिव्यक्तीची समृद्धी रसिकांसमोर साकार झाली. कथाकथनातील नाट्य, आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि पार्श्वसंगीत यामुळे कथांचे जिवंत अनुभवात रूपांतर झाले. लोकपरंपरा ही केवळ संग्रहालयात ठेवण्याची वस्तू नसून ती जगण्याची पद्धत आहे, हा संदेश या सादरीकरणांतून प्रकर्षाने पुढे आला. बहुरूपी भारुडांनी संमेलनाला लोकनाट्याची रंगत आणली. भारुड ही केवळ करमणूक नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, राजकीय उपरोध आणि मानवी स्वभाव यावर नेमके भाष्य करणाऱ्या या सादरीकरणांनी रसिकांना हसवले, विचार करायला लावले आणि अंतर्मुखही केले.
गझल आणि कवितांच्या मैफलींनी या लोकपरंपरेच्या उत्सवाला साहित्यिक उंची दिली. भावनांची नजाकत, शब्दांची काटेकोर निवड आणि आवाजातील सुरेलता यामुळे या मैफिली अत्यंत प्रभावी ठरल्या. ग्रामीण मातीचा गंध जपणाऱ्या कविता आणि समकालीन संवेदनांवर भाष्य करणाऱ्या गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या संमेलनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लोककलावंतांना दिलेले मानाचे स्थान. अनेकदा लोककला ही दुय्यम समजली जाते; मात्र येथे ती साहित्यिक चर्चांच्या बरोबरीने मांडली गेली. त्यामुळे लोककलावंतांचा आत्मविश्वास वाढला आणि नव्या पिढीसमोर लोकपरंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले. शहर आणि ग्रामीण संस्कृती यांच्यातील अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह ठरतो.