

प्रविण शिंगटे
सातारा : साताऱ्यात आयोजित 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ वैचारिक आणि सांस्कृतिक पर्व न राहता पुस्तकविक्रीच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरले. संमेलनाच्या चार दिवसांत तब्बल 8 कोटी 72 लाख रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली असून, गेल्या दहा वर्षांत झालेल्या साहित्य संमेलनांतील ही उच्चांकी विक्री असल्याचे चित्र समोर आले आहे. शेवटच्या दिवशी तर रात्री उशिरापर्यंत विविध साहित्य संपदा खरेदीसाठी वाचकांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.
साताऱ्यातील साहित्य संमेलनात 256 हून अधिक पुस्तक स्टॉल्स लावण्यात आले होते. राज्य व देशभरातील नामवंत प्रकाशन संस्था आणि वितरकांनी सहभाग नोंदवून पुस्तकांची अक्षरशः जत्राच भरली होती. शासनाचे विविध विभाग, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ, साहित्य अकादमी (दिल्ली), ज्ञानपीठ, बालभारती, फोटो झिंको पुणे, वाणी प्रकाशन (हिंदी), भाषा संचालनालय, ग्रंथाली, राजहंस, पॉप्युलर, मेहता, मॅजेस्टिक, माय मिरर, विश्वकर्मा, संस्कृती प्रकाशन, साकेत, शब्द, कैलास, प्रशांत, युनिक ॲकॅडमी, डायमंड, सरस्वती, लोकवाङ्मय, देशमुख ॲण्ड देशमुख आदी नामवंत प्रकाशक व वितरकांनी सहभाग घेतला होता.
अनुभवकथन, चरित्रे, आत्मचरित्रे, व्यक्तीचित्रणे, इतिहासपर व मार्गदर्शनपर पुस्तके, विनोदी लेखसंग्रह, संदर्भग्रंथ, विज्ञानकथा, कुमार साहित्य, कादंबऱ्या, ऐतिहासिक व चरित्रात्मक कादंबऱ्या, वैचारिक ग्रंथ, बालसाहित्य, काव्यसंग्रह, राजकीय व संशोधनात्मक ग्रंथ, ललित साहित्य, नाटके, लेखसंग्रह, आरोग्यविषयक तसेच संतवाङ्मय अशा विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. मुख्य सभा मंडपात जाण्यासाठी ग्रंथप्रदर्शनाच्या दालनातूनच मार्ग असल्याने संमेलनास भेट देणाऱ्या सुमारे 10 लाखांहून अधिक साहित्यरसिकांनी ग्रंथदालनालाही भेट दिली, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी दिली. चार दिवसांच्या संमेलनकाळात साहित्यप्रेमी नागरिकांसह शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ख्यातनाम लेखकांची पुस्तके तसेच स्पर्धा परीक्षांसाठीची पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली गेली. त्यामुळे साताऱ्यातील शतकपूर्व मराठी साहित्य संमेलन प्रकाशक व वितरकांसाठी नवसंजीवनी ठरले, असे चित्र पाहायला मिळाले.