

आदेश खताळ
सातारा : साताऱ्यात आयोजित 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ विक्री स्टॉल्सवर वाचकांचा कल ऐतिहासिक कादंबऱ्यांकडे अधिक होता. त्यामुळे साहित्य संमेलनात शिवकालीन तेज पुन्हा जागे झाले. विविध नामांकित प्रकाशन संस्थांनी थाटलेल्या स्टॉल्सवर ऐतिहासिक कादंबऱ्यांची लोकप्रियता शिखरावर होती. विशेष म्हणजे या ऐतिहासिक कादंबऱ्यांची विक्री इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक झाली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशकांनी ऐतिहासिक कादंबऱ्या, चरित्रे व अभ्यासपूर्ण इतिहास ग्रंथ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवाई काळ, मराठा सेनापती तसेच स्वराज्याच्या उभारणीत योगदान देणारे शूरवीर अशा विविध विषयांवरील ऐतिहासिक कादंबऱ्यांना वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवाजी सावंत यांची श्रीमानयोगी आणि छावा, रणजित देसाई यांची स्वामी आणि पावनखिंड, बाबसाहेब पुरंदरे यांची राजा शिवछत्रपती, ना. स. इनामदार यांची झुंज, शहेनशहा व राऊ तसेच विश्वास पाटील यांची संभाजी, पानिपत आणि अस्मानभरारी या कादंबऱ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. यावरून ऐतिहासिक कादंबरीचा सुवर्णकाळ आजही टिकून असल्याचे स्पष्ट झाले.
इतिहासात स्त्रीशक्ती आणि समाजसुधारकांवरील लेखनालाही वाचकांची विशेष पसंती मिळताना दिसली. प्रणव पाटील यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि विजय जहागिरदार यांच्या कर्मयोगिणी या ग्रंथांना मोठी मागणी होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या, न्यायप्रिय आणि कर्तृत्वान स्त्री शासकाच्या जीवनावर आधारित साहित्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रकाशकांनी आवर्जून नमूद केले.
नव्या पिढीतील वाचक ऐतिहासिक कादंबरीकडे केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर इतिहासाची समज वाढवणारे साधन म्हणून पाहत आहेत, हे यंदाच्या संमेलनात ठळकपणे जाणवले. संदर्भासहित, संशोधनाधारित आणि विस्तृत माहिती देणाऱ्या कादंबऱ्या व चरित्रे विशेष लोकप्रिय ठरली. इतिहासात होऊन केलेल्या शूरवीरांवर सविस्तर लिहिलेली चरित्रे व कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात वाचल्या जात असल्याचे ग्रंथ विक्रीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यामध्ये जयसिंगराज पवार यांचे सेनापती संताजी घोरपडे, काका विधाते यांची संताजी, प्रा. डॉ. हनवते यांची सेनापती धनाजी जाधव तसेच श्रेयस भावे व योगिता रिसबड यांची इंग्रजीतील द लिजेंड ऑफ बहिर्जी नाईक या ग्रंथांनीही वाचकांचे लक्ष वेधले. बाजीप्रभू देशपांडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासारख्या रणांगणातील पराक्रमी योद्ध्यांवर आधारित कादंबऱ्यांचीही विक्री समाधानकारक झाली.
आजचा वाचक केवळ गौरवगाथा वाचण्यात समाधानी नसून इतिहास काळाची सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेण्यास उत्सूक आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यात आयोजित साहित्य संमेलनात ऐतिहासिक कादंबऱ्यांना मिळालेला प्रतिसाद विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. मराठी वाचकांचा इतिहासाशी असलेला भावनिक आणि बौद्धिक संबंध आजही तितकाच घट्ट असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले. बदलत्या काळातही ऐतिहासिक कादंबरी हा साहित्य प्रकार अधिक समृद्ध होत असून, नव्या लेखकांसाठीही तो प्रेरणा देणारा ठरत आहे.