

विठ्ठल हेंद्रे
सातारा : साताऱ्यात साहित्य संमेलन होणार असल्याने 15 डिसेंबरपासूनच बालकुमारांमध्ये माहोल झाला होता. भव्यदिव्य मंडप, ग्रंथदिंडी, बोलायला स्वतंत्र व्यासपीठ, अनेक गोष्टींची वाचायला मिळालेली पुस्तकं यामुळे सातारा जिल्ह्यातील मुलं हरखून टूम्म झाली. बालकुमारांसाठी हे साहित्य संमेलन बौध्दिक दिवाळीचेच ठरले असून वक्तृत्व, कलागुण सादर करताना मुलांनी संमेलनाचे व्यासपीठ आपल्या आवाजाने दणाणून सोडले.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र असा बालकुमार वाचक कट्टाचे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. संमेलनाच्या मुख्य प्रवेश दारातून येताना पहिलेच असलेले हे व्यासपीठ होते. बालकुमारांसाठी स्वतंत्र भव्य मंडप, अद्ययावत स्टेज, शेकडो खुर्च्या आणि देशपातळीवरील पुरस्कारप्राप्त मान्यवर असा बाज होता. बाल वाचकांना बालसाहित्यकांची भेट व्हावी यासाठी हा बाल कट्टा होता. यामध्ये मुलांनी स्वरचित कविता, कथाकथन सादर केले. यासाठी सातारा जिल्ह्यातील मुले होते. या कट्ट्यासाठी सहभागी मान्यवरांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ल.म.कडू, एकनाथ आव्हाड, संगीता बर्वे, राजीव तांबे तसेच सुंदर माझी शाळेचा कवी गणेश घुले हे आले होते. तसेच संवादक म्हणून संदीप धायगुडे, प्रतिभा चौगुले, सुरेश जाधव, दिपीका शिंदे, रेहना भालदार, संदीप सपकाळ यांनी काम पाहिले.