

विशाल गुजर
सातारा : मराठेशाहीच्या देदीप्यमान इतिहासातील चौथी राजधानी असलेल्या साताऱ्यात भरलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने उपस्थितीचे सर्व विक्रम मोडले. साहित्यिक, लेखक, वाचक, विद्यार्थी आणि सातारकर अशा सुमारे 8 लाखांहून अधिक साहित्यप्रेमींनी या संमेलनाला भेट दिली. सोशल मीडियावर संमेलनाची जोरदार चर्चा रंगत राहिल्याने दिवसेंदिवस गर्दीचा ओघ वाढतच गेला.
चार दिवस चाललेल्या या संमेलनात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील रसिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यप्रेमी सहकुटुंब साताऱ्यात दाखल झाले होते. सातारा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पुणे, कोल्हापूर, मुंबई तसेच गोवासह राज्याबाहेरील भागांतूनही साहित्यप्रेमींनी आवर्जून हजेरी लावली. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली आजची पिढी मराठी साहित्याच्या वातावरणात मनापासून रमलेली पाहणे समाधानकारक असल्याची भावना अनेक ज्येष्ठ साहित्यिक व वाचकांनी व्यक्त केली. साहित्य, विचार आणि संवाद यांची ओळख लहान वयातच व्हावी, या उद्देशाने अनेक पालक आपल्या चिमुकल्यांना घेऊन संमेलनस्थळी येताना दिसले. त्यामुळे सर्वच पुस्तक दालने वाचकप्रेमींनी हाऊसफुल्ल झाली होती.
केवळ पुस्तकेच नव्हे तर बुध्दीला आणि विचाराला चालना देणारे परिसंवाद, परिचर्चा तर काव्य मन फुलवण्यासाठी कविकट्ट्यावर सातारकरांसह राज्यभरातील वाचकांनी गर्दी केली होती. याचबरोबर मुलाखती, हास्यजत्रा, फोक अख्यान या कार्यक्रमांनाही साहित्यिकांनी चांगली दाद दिली. त्यामुळे अनेक वर्षानंतर संमेलनाच्यानिमित्ताने प्रथमच पूर्ण शाहू स्टेडिमयम गर्दीने बहरून गेले होते. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नेहमी रात्री नऊ वाजताच शांत होणारे सातारा शहर चार दिवस रात्री उशिरापर्यंत जागे होते. बोचऱ्या थंडीतही पालक आपल्या लहान मुलांसह संमेलनाचा आनंद घेत होते. चर्चासत्रे, कवीसंमेलने, पुस्तक प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साहित्यनगरी चैतन्यमय बनली होती. संमेलनाचा आस्वाद घेतल्यानंतर अनेक रसिकांनी परिसरातील फूड स्टॉल्सवरील देशी आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना विशेष पसंती दिली. संमेलनस्थळाजवळील छोटी-मोठी रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलले होते.
शिवछत्रपतींच्या संग्रहालयालाही भेट
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयालगत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या 14 एकर परिसरात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनासाठी आलेल्या हजारो साहित्यप्रेमींनी याच संधीचा लाभ घेत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयालाही भेट दिली. नुकतेच नूतन वास्तूत स्थलांतरित करण्यात आलेल्या या संग्रहालयात शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक वस्तू आणि स्वतंत्र दालनांची मांडणी करण्यात आली असून, शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास डोळ्यात साठवण्यासाठी येथे मोठी गर्दी झाली होती.