

सातारा : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची राज्यातील गावोगावी प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने अभियानाच्या अंमलबजावणीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे अभियानाचा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्याच्या ग्राम विकास विभागाने घेतला आहे.
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्याची कार्यक्षमता वाढवण्याकरता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांसाठी सन 2025-2026 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर प्रोत्साहन देण्याकरता राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबवण्यात येत आहे. अभियानाचा प्रारंभ दि. 17 सप्टेंबरपासून झाला आहे.
तथापी अभियानाच्या सुरूवातीच्या कालावधीत राज्यात उदभवलेली पूरपरिस्थिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे अभियानाच्या अंमलबजावणीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींना या अभियानात प्रभावी सहभागाची संधी मिळावी. अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची पूर्तता करता यावी यासाठी दि. 31 मार्च 2026 पर्यंत अभियानाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय ग्राम विकास विभागाने काढला आहे.