

कराड : कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यानच्या ज्या उड्डाणपुलावर भीषण अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला, त्याच पुलावर एका महिला पोलिसाने रात्रीच्या वेळी नव्या कोऱ्या कारसमोर थाटामाटात वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनची रिल सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कायद्याचे रक्षकच वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासत असतील, तर सर्वसामान्यांनी काय आदर्श घ्यायचा, असा संतप्त सवाल कराडकरांकडून उपस्थित केला जात आहे.
कराड शहरातील कोल्हापूर नाका ते नांदलापूर हा सुमारे साडेतीन किलोमीटरचा एकखांबी उड्डाणपूल सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. प्रशस्त रस्ता आणि अडथळ्यांचा अभाव यामुळे पुलावर वाहनांचा वेग वाढत असून अपघातांचाही धोका निर्माण झाला आहे. अवघ्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूरहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा येथे भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर पुलावरील वेगावर नियंत्रण आणण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
अशा परिस्थितीत संबंधित महिला पोलिस रात्रीच्या वेळी उड्डाणपुलावर कार थांबवून केक कापताना, कारच्या बोनेटवर बसून फोटो काढताना आणि विविध पोझ देताना रिलमध्ये दिसत आहे. सार्वजनिक महामार्गावर अशा प्रकारे सेलिब्रेशन केल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित महिला पोलिसाची रिल व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
'पायरों गन'मधून 'सोनेरी' ठिणग्यांचा फवारा
रिलमध्ये मॅडमच्या 'बर्थ डे सेलिब्रेशन'चा थाट पाहायला मिळतो. महामार्गावरील पथदिव्यांचा झगमगाट, नव्या कोऱ्या कारसमोर ठेवलेला केक, हातात फुलांचा बुके, कारच्या बोनेटवर बसलेल्या मॅडम आणि 'पायरों गन' मधून उडणाऱ्या सोनेरी ठिणग्यांचा फवारा, अशा थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.