

सातारा : थर्टी फर्स्ट अर्थात 31 डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागतावेळी हुल्लडबाजी होवू नये यासाठी सातारा जिल्हा पोलिसांचा वॉच राहणार असून तब्बल 2000 पोलिस तैनात राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्वच पर्यटन ठिकाणी पोलिसांची विशेष पथके गस्त घालणार आहेत.
2025 या सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन 2026 या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. नवीन वर्षाचा उत्साह साजरा करताना जिल्हावासियांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हा पोलीस अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील पाचगणी, महाबळेश्वर, वाई, कास, बामणोली, तापोळा, मेढा, कोयनानगर या पर्यटन स्थळांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. किल्ले आणि धरणे यांसारख्या संवेदनशील पर्यटन स्थळांवर अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्ते, चेकपोस्ट व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी पॉईंट नेमले जाणार आहेत. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना ब्रेथ ॲनालायझर मशीन दिली जाणार आहेत. यासाठी 39 पथके तयार करण्यात आलेली आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्यानिहाय 2 पथके हॉटेल, लॉजेस, धाबे तपासासाठी नेमली आहेत. विशेषतः पाचगणी, महाबळेश्वर, वाई, कास, बामणोली अशा पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पोलिसांचे जास्तीचे लक्ष राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस वॉच ठेवणार आहेत. उपविभागनिहाय 7 निर्भया पथकामार्फत ही कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनी उत्साह साजरा करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच तात्काळ मदतीसाठी डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.