

बंगळूर : नवीन वर्ष साजरे करणाऱ्यांना राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मद्यविक्री दुकाने 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 पासून रात्री 1 पर्यंत सुरू राहणार आहेत. बेळगाव, बंगळूर, म्हैसूर आणि मंगळूरसह राज्यातील सर्व महापालिका कार्यक्षेत्रातील दुुकाने सकाळी 6 वाजता सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही शिथिलता फक्त 31 डिसेंबर रोजीच लागू असेल. उर्वरित दिवसांसाठी नेहमीप्रमाणे दुकाने सुरू राहतील.
शासनाच्या आदेशानुसार, बुधवारी (दि. 31 डिसेंबर) सकाळी 6 ते 1 पर्यंत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. ही वेळ सामान्य वेळेपेक्षा वाढविण्यात आली आहे. याचा उद्देश नवीन वर्ष नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने साजरे करणे आहे. हा नियम सर्व बार, पब, वाईन शॉप आणि इतर मद्यविक्री दुकानांना लागू आहे. हा नियम सीएल-5 परवानाधारकांनाही लागू असणार आहे. तुमच्याकडे सीएल-5 परवाना असेल तर तुम्ही 24 तासांसाठी मद्य पार्टी आयोजित करता येणार आहे. नवीन वर्षाच्या दिवशी यासाठी कठोर वेळ मर्यादा लागू केली जाते. आदेशानुसार सीएल-5 परवाने असलेल्या खासगी पार्ट्यांनाही पहाटे 1 पर्यंत मद्य विक्रीची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. पहाटे 1 नंतर कोणत्याही कारणास्तव मद्य विक्री करू दिली जाणार नाही.
नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान अनुचित प्रकार, अपघात, दंगली रोखण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. विशेषतः जास्त प्रमाणात मद्यप्राशन केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नियमावलींचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. लोकांना नवीन वर्ष सुरक्षित आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.