

दहिवडी : ॲल्युमिनियम तारा चोरी करण्याऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून सुमारे 13 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने स्थानिक परिसरात खळबळ उडवली आहे.
अभिजीत किशोर साळुंखे (रा. बावडा, इंदापूर, पुणे), ओंकार चंद्रकांत कंक (रा. धायरी, माते नगर, पुणे), यश नागेश कांबळे (रा. तळजाई माता वसाहत, पुणे), गुणवंत युवराज पाटील (वय 24, रा. आव्हाळवाडा, वाघोली, पुणे), रोहन सुभाष पाटील (रा. कात्रज, पुणे) व दीपक अनिल जाधव (रा. धायरी, माते नगर, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यू.आर.एस.आर. पॉवर स्ट्रक्चर कंपनीच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी झाल्याने दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला, ज्यामध्ये दहिवडी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वात अज्ञातांचा शोध घेतला. तपासादरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की ही टोळी लवकरच दहिवडी परिसरात पुन्हा चोरी करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचून चोरट्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे, पोलीस हवालदार रविंद्र खाडे, पोलीस नाईक नितीन युवराज धुमाळ यांच्यासह पोलिसांची टीम कार्यरत होती. संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरट्यांकडून 5 लाख रुपये किंमतीचे ॲल्युमिनियम तारा तसेच 8 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 13 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींविरोधात यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोललिस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.