

नागठाणे : पाडळी (ता. सातारा) येथून 5 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा खून करून मृतदेह जाळल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून शेतकऱ्याचा खून केला आहे. याप्रकरणी एलसीबीने एकाला अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी बाळू शेलार (वय 45, रा. पाडळी, ता. सातारा) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भरत ऊर्फ मधू रंगनाथ ढाणे (वय 48) याला अटक करण्यात आली आहे. संभाजी शेलार हे दि. 8 जून 2025 पासून घरात कुणालाही न सांगता बेपत्ता झाले होते. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा तपास सुरू होता. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय सूत्रांकडून संभाजी शेलार यांचा गावातील एकाने खून केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
ताब्यात घेऊन संशयित भरत ढाणे याच्याकडे चौकशी केली असता संभाजी शेलार यांचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह जाळून टाकल्याची त्याने कबुली दिली. मृत संभाजी शेलार हे पाडळी येथे एकटेच वास्तव्यास होते. त्यांचे कुटुंबीय पाडळी येथे राहत नाहीत. याचाच फायदा घेत संशयिताने मृतदेह जाळून टाकला. अखेर 6 महिन्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स.पो.नि.रमेश गर्जे, सपोनि डी. एस. वाळवेकर, रोहित फार्णे आणि बोरगाव पोलिसांच्या डी.बी पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.