

कराड : मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी देशी पिस्तुलासह शहरात फिरत असलेल्या तरुणाच्या कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुसक्या आवळल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला असून सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पिल्या ऊर्फ श्रेयस श्रीरंग पवार (रा. लिगाडे पाटील कॉलेज समोर, सैदापूर, ता. कराड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, की कराड बसस्थानक परिसरातील एका मोबाईल शॉपीमध्ये अखिलेश नलवडे याचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित अजिम चांद बादशहा मुल्ला (रा. मलकापूर) यास ठार मारण्याच्या उद्देशाने अखिलेशचा मित्र पिल्या ऊर्फ श्रेयस पवार हा गजानन हौसिंग सोसायटी परिसरात पिस्तुलासह फिरत होता. ही माहिती कळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, मोहसीन मोमीन आदींनी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पाठलाग करून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 65 हजाराची देशी बनावटीची पिस्तुल व 4 हजार रुपयाची ‘के एफ 7.65’ असे लिहिलेली दोन जिवंत काडतुसे असा एकूण 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयीताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.