

प्रवीण शिंगटे
सातारा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना शाश्वत उपजीविका निर्माण करून पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा (ता. महाबळेश्वर) येथे हाऊसबोट पर्यटन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरचा नावलौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून 1372 मीटर उंचीवर व पश्चिम घाटाच्या रांगेत सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात महाबळेश्वर वसले आहे. महाबळेश्वर तालुक्यात तापोळा गावाची ओळख मिनी काश्मीर म्हणून आहे. कोयना जलाशयामध्ये विविध बोटिंग व्यवसाय सुरू आहे. त्याला पर्यटक नेहमीच पसंती देत असतात.
तापोळा समुद्र सपाटीपासून अंदाजे 800 मीटर उंचीवर वसलेले आहेे. या उंचीमुळे या प्रदेशाला थंड आणि आल्हाददायक हवामान मिळते. विशेषत:, पावसाळा आणि हिवाळ्यात उंचावरील स्थान हिरवळ व धुक्याने झाकलेल्या टेकड्यांमुळे त्याचे काश्मीरशी साम्य वाटते. तापोळ्याचे आल्हाददायक हवामान असल्याने हे वर्षभर फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तापोळा कोयना धरणाच्या 90 कि.मी. लांबीच्या शिवसागर जलाशयाच्या काठावर वसले आहे. महाबळेश्वर व कोकणास जोडणारा केबल स्टे ब्रिजमुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यामध्ये पर्यटनवाढीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठकही झाली. या बैठकीमध्ये महिला बचतगटांना पर्यटन आधारित सेवा उद्योगाच्या माध्यमातून शाश्वत उपजीविका बळकट करण्याच्या हेतूने हाऊसबोट उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तापोळा येथे कोयना धरणाच्या जलाशयामध्ये दोन हाऊसबोटच्या माध्यमातून बचतगटातील महिलांना उपजीविकेची संधी उपलब्ध होणार आहे.